महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर… पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून बड्या मंत्र्याला एक संघटनात्मक नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ऐकीकडे राज्यात बावनकुळेंवर जरांगे पाटील टीकास्त्र सोडत असताना दुसऱ्या बाजूने भाजपकडून बावनकुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे बावनकुळे आता राजस्थानमधील पक्षाच्या निवडणूक धोरणांमध्ये आणि प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावतील.
याचबरोबर, माजी खासदार हरीश त्रिवेदी यांची या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बावनकुळे आणि त्रिवेदी हे दोघे मिळून राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी करतील. ही नियुक्ती पक्षाने आगामी निवडणुका गंभीरपणे घेतल्याचे आणि त्यासाठी अनुभवी नेत्यांवर विश्वास ठेवल्याचे दर्शवते. या माध्यमातून पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक मजबूत करण्याची रणनीती असल्याचे दिसत आहे.
