मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
दिल्लीतील काँग्रेस आणि सीजेपी कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलीस आणि रेल्वेला अवमान प्रकरणी नोटीस बजावली आहे. सर्व मेट्रो स्थानके खुली ठेवण्याचे आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.
दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेस परिसरासह विविध ठिकाणी काँग्रेस आणि सीजेपी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जंतर-मंतरकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेड्स लावून त्यांना थांबवण्यात आले. राजीव चौक परिसरात आंदोलकांची धरपकड करण्यात आली, त्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये भरण्यात आले. यावेळी आयटीबीपी, सीआरपीएफ आणि रॅपिड ॲक्शन फोर्सच्या मोठ्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
या आंदोलनासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने दिल्ली पोलीस आणि रेल्वेला अवमान प्रकरणी नोटीस बजावत मंगळवारपर्यंत उत्तर मागितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुप्रीम कोर्टाने सर्व मेट्रो स्थानके खुली ठेवण्याचे आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. जनतेच्या गरजेनुसार मेट्रो सेवा बंद न करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, पुढील सुनावणीपर्यंत मेट्रो सेवांमध्ये कोणताही अडथळा न आणण्याचे म्हटले आहे.
