Eknath Khadse | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट! अमित शाहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण…
राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले असताना, आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “मला भाजपमध्ये प्रवेश करण्यामध्ये कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे. माझे काही कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील, पण मी जाणार नाही.” दरम्यान, भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी खडसे यांची भेट घेतल्याच्या चर्चांबाबतही त्यांनी भाष्य केले. तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. “गिरीश महाजन खूप लहान माणूस आहेत. ते मंत्री होईपर्यंत मी त्यांना सर्व प्रकारे मदत केली. मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाच्या पाठिंब्यामुळेच त्यांना ओळख मिळाली,” असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. “मी दिल्लीला गेलो असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला स्वतः फोन करून बोलावले होते. त्यांनी मला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची ऑफर दिली होती,” असा दावा त्यांनी केला. यासोबतच भाजप प्रवेशाबाबत काही स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याचाही आरोप खडसे यांनी केला. “माझा पक्षप्रवेश झाला तर स्थानिक नेते काम करणार नाहीत, अशी भूमिका काहींनी घेतली. ‘खडसे को लिया तो सीट गिरा देंगे’ अशा प्रकारचे दबाव टाकण्यात आले,” असा आरोप त्यांनी नाव न घेता केला.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.