घरात बसून पक्ष वाढत नाही तर…; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्यभर दौरे करावेत, असा सल्ला दिला. “केवळ बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची गरज आहे. घरात बसून पक्ष वाढत नाही,” असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गिरीष महाजन यांनी उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्यभर दौरे करावेत, असा सल्ला दिला. “केवळ बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याची गरज आहे. घरात बसून पक्ष वाढत नाही,” असे ते म्हणाले.
महाजन यांनी पुढे दावा केला की, सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यास अनेक नेते आणि कार्यकर्ते उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जनतेमध्ये जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याला प्रत्युत्तर देताना महाजन यांनीही ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्यांनी ठाकरे गटाची राजकीय ताकद कमी होत असल्याचा दावा करत अनेक नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य केले होते.
दुसरीकडे, संजय राऊत यांनीही महाजन यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यांनी महाजनांवर विविध आरोप करत राज्यातील काही विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसेच तपास यंत्रणांच्या कारवाईबाबतही त्यांनी भाष्य केले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेमुळे राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला असून, आगामी काळात या वादाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
