Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राजेश पाटील (राष्ट्रवादी) आणि अजित नरके (शिवसेना) ही दोन प्रमुख नावे चर्चेत आहेत. भाजपने सध्या दोन पावले मागे घेतल्याचे दिसत असून, महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज होणार असून, या पदासाठी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे अध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांची बैठक थोड्याच वेळात होणार असून, त्यात अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद गेल्यास चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेकडे (शिंदे गट) हे पद गेल्यास चंद्रदीप नरके यांचे बंधू आणि गोकुळचे अनुभवी संचालक अजित नरके यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते.
सध्याच्या परिस्थितीत भाजपने अध्यक्षपदाच्या शर्यतीतून काही प्रमाणात माघार घेतल्याचे चित्र आहे. शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून लोकांमध्ये असलेला रोष पाहता भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात अध्यक्षपद राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे देण्याचा एक फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे समजते. राजेश पाटील आणि अजित नरके या दोन्ही प्रमुख नावांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
