मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेवक भरत कोठारी यांनी पर्युषण काळात ८ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी केली आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. मात्र, मनसेने या मागणीला विरोध करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
मीरा भाईंदरमध्ये पर्युषण महापर्वाच्या पार्श्वभूमीवर मांस विक्री बंदीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे नगरसेवक भरत कोठारी यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कत्तलखाने आणि मांस-मटणाची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे. कोठारी यांनी आयुक्त आणि महापौरांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, ही मागणी कोणाच्याही खानपानाच्या स्वातंत्र्याच्या विरोधात नसून, जैन समाजाच्या धार्मिक भावना, श्रद्धा आणि अहिंसा तत्त्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेने या मागणीला समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारने दोन दिवसांची बंदी ऑलरेडी दिली असताना, आणखी आठ दिवस बंद ठेवण्याची मागणी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे असल्याचा आरोप केला आहे. जर महानगरपालिकेने या संदर्भात नकारात्मक भूमिका घेतली तर मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मांस विक्री बंदीवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
