मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबईत पावसाने जोर धरला असतानाच घाटकोपरच्या साकीनाका परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री गौसिया चाळ परिसरातील घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. दोन ते तीन घरांवर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत पावसाने जोर धरला असतानाच घाटकोपरच्या साकीनाका परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री गौसिया चाळ परिसरातील घरांवर डोंगराचा काही भाग कोसळला. दोन ते तीन घरांवर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच मध्यरात्रीच्या सुमारास डोंगराचा भाग अचानक घरांवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळ अत्यंत अरुंद असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एकावेळी केवळ एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा असल्याने यंत्रसामग्री पोहोचवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका कर्मचारी एक-एक दगड, माती आणि वीट हाताने बाजूला करत ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.
या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. “काही जण आत अडकले असण्याची भीती आहे. अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. गल्ली अत्यंत अरुंद असल्याने एक-एक दगड हाताने बाजूला करावा लागत आहे. अतिशय वाईट दुर्घटना घडली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
स्थानिकांकडून बचावकार्याबाबत नाराजी व्यक्त होत असतानाच प्रशासनाकडून शक्य तितक्या वेगाने मदतकार्य सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचारी दगड-माती बाहेर काढण्याचे काम करत आहेत.
दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांमध्ये विकी यादव, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांची सद्यस्थिती आणि बचावकार्याची पुढील माहिती प्रशासनाकडून स्पष्ट होणे बाकी आहे.
मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जुन्या इमारती, दरडी, भिंती आणि झाडे कोसळण्याच्या घटनांचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घाटकोपरमधील या दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
