Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान

Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान

| Updated on: Jun 22, 2026 | 12:53 PM

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अनपेक्षित विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, विजयानंतर गोकुळ गीते यांनी पहिली प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि अनोख्या पद्धतीने माफीही मागितली.

माध्यमांशी संवाद साधताना गीते म्हणाले की, “या मतदारसंघाला सक्षम आणि योग्य प्रतिनिधी हवा होता. मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला संधी दिली आणि हा विजय मिळवून दिला. मी प्रचार थांबवला होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन शांत बसलो होतो. मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी माझं ऐकलं नाही आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेत हा विजय मिळवून दिला. त्यासाठी मी त्यांची माफी मागतो, पण त्याचबरोबर त्यांचा शतशः आभारीही आहे.”

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपला विश्वासघात झाल्याचा आरोप करत काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र याबाबत प्रतिक्रिया विचारली असता गोकुळ गीते यांनी कोणतीही टीका करण्यास नकार दिला. “त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्याची गरज नाही. त्याचे उत्तर ते स्वतः देतील,” असे म्हणत त्यांनी विषय टाळला.

दरम्यान, निकालानंतर गोकुळ गीते यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र याबाबत बोलताना गीते म्हणाले की, “मला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. पुढील राजकीय निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. हा विजय केवळ माझा नसून हजारो कार्यकर्त्यांचा आहे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही.”

यामुळे गोकुळ गीते पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 22, 2026 12:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us