हो… कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा…
राज्यातील राजकारणात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. या भेटीनंतर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला मी भेटलो, त्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर ते चुकीचं आहे. एवढा कदरूपणा बरा नव्हे," असा टोला लगावला होता.
राज्यातील राजकारणात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. या भेटीनंतर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला मी भेटलो, त्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर ते चुकीचं आहे. एवढा कदरूपणा बरा नव्हे,” असा टोला लगावला होता.
या वक्तव्याला आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “हो, कदरूपणा आहे म्हणू. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला आणि भाजपसोबत गेले म्हणून आमचं भांडण नाही. मात्र अमित शहा यांच्या मदतीने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या शिवसेनेवर दरोडा टाकला, हा आमचा खरा वाद आहे.”
राऊत यांनी पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचाही उल्लेख करत, “अजित पवार पक्ष सोडून गेले म्हणून वाद नाही. पण शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहांच्या मदतीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, हा वादाचा मुद्दा आहे,” असे म्हटले.
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत, “आमचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेलं आहे. बाळासाहेबांच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे झालात? त्या पक्षाचे आई-वडील तुम्ही कसे होऊ शकता?” असा सवाल उपस्थित केला. तसेच पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा उल्लेख करत, “हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आई-वडील होऊ शकतात का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीपासून सुरू झालेल्या या राजकीय वादामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, या आरोप-प्रत्यारोपांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून पुढे काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.