Chandrakant Khaire : ‘एवढं महत्व कशाला देता, हा विषय आता संपवा’; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
Chandrakant Khiare Statement : औरंगजेबाची कबर काढण्यावरून राज्यात सध्या वेगळा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आज शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाची कबर काढण्यावरून राज्यात सध्या वेगळा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची ही कबर आहे. ती काढून टाकण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांच्याकडून देखील यावर आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. त्यावर आज शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, हा सगळा मुद्दा केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून पुढे आणला जात आहे. हिंमत असेल तर त्यांनी तिकडे आहेत त्या कबरी आधी काढाव्या. इथली कबर काढायला माझा विरोध नाही. त्याचं काय करायचं ते सरकार करेल. पण इथेच भद्रा मारुतीचं मंदिर आहे. सध्या या ठिकाणी काय होईल या भीतीमुळे इथल्या भाविकांची संख्या ही 50 % घटली आहे. इथलं वातावरण खराब व्हायला लागलं आहे. अशा राजकीय दृष्टिकोनातून काढलेल्या विषयांनी हे सगळं सुरू झालं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला पाहिजे. आम्हाला देखील औरंगजेबचा राग आहे. पण कशाला पाहिजे त्याचा विषय? ज्याने आपले हिंदू मारले. मंदिरं तोडली. तो इथं मेला त्याची कबर इथं टाकली. आता हा विषय संपवला पाहिजे. गेले 300 -350 वर्ष त्याला एवढं महत्व का देत आहे आपण? हा विषय आता संपवला पाहिजे, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हंटल आहे.