खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत… FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
खाजगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या किमतीत मोठी नफाखोरी सुरू असल्याचा खुलासा एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केला आहे. ११ रुपयांच्या सलाईन नळीची ३२५ रुपयांना विक्री करून रुग्णालये २८४१ टक्के नफा कमावत आहेत. औषध मूल्य नियंत्रणाखाली नसलेल्या उपकरणांवर मर्यादा आणण्यासाठी एफडीएने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे, ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी खासगी रुग्णालयांकडून वैद्यकीय उपकरणांच्या किमतीत होणाऱ्या अवाढव्य नफाखोरीचा धक्कादायक खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील रुग्णालयांच्या पाहणीत असे दिसून आले आहे की, केवळ ११ रुपये खरेदी किंमत असलेल्या सलाईन नळीची छापील एमआरपी ३२५ रुपये आहे. याचा अर्थ त्यावर २८४१ टक्के एवढा वाढीव नफा लावला जात होता. या पाहणीत केवळ सलाईन नळीच नव्हे, तर इतर वैद्यकीय उपकरणांमध्येही प्रचंड दर वाढ झाल्याचे आढळले. ६ रुपये ७५ पैसे खरेदी असलेल्या सिरिंजवर ५७ रुपये २० पैसे, तर २९ रुपये ४१ पैशांना मिळणाऱ्या कॅथेटरची एमआरपी ३१० रुपये होती. औषध मूल्य नियंत्रण आदेशांतर्गत काही औषधांच्या किमतींवर मर्यादा आहेत.
मात्र, बहुतांश वैद्यकीय उपकरणे आणि साहित्यांवर अशा मर्यादा नसल्याने त्यांच्या किमती अनियंत्रित राहतात. या गंभीर निष्कर्षांनंतर, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) आणि औषध विभागाला पत्र लिहिले आहे. त्यांनी खरेदी किंमत आणि जाहीर केलेली एमआरपी यांच्यातील मान्यताप्राप्त तफावतीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे ठरवण्याची शिफारस केली आहे. हे रुग्णांना आर्थिक लुटीपासून वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
