Budget 2026 Announcement : मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात विविध विकास प्रकल्पांची घोषणा केली. यात मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, दिल्ली-वाराणसी हायस्पीड रेल कॉरिडॉर, बायोफार्मासाठी 10 हजार कोटी, खनिज कॉरिडॉर आणि MSME साठी तरतुदींचा समावेश आहे. पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटन वाढीवर भर देत भारताच्या विकासाला गती देण्याचा मानस आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगाराला चालना मिळेल.
बायोफार्मा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी पुढील पाच वर्षांत 10 हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे, ज्यामुळे भारत बायोफार्माची एक जागतिक शक्ती बनेल. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी (MSME) 10 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे, तसेच कंटेनर निर्मितीसाठीही तेवढीच तरतूद आहे. सेमीकंडक्टर क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहेत. ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये खनिज कॉरिडॉर तयार करण्याची योजना आहे. वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग सुरू केले जातील. पर्यटन वाढीसाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे.
