पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी नांदूर मधमेश्वरच्या पाण्याची मागणी करत समृद्धी महामार्ग रोखला. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र लेखी आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिला शेतकऱ्यांचा सहभाग होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी पाण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारले आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील पाणी रब्बी पिकांना मिळावे, या मुख्य मागणीसाठी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला शेतकऱ्यांचाही सहभाग होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
मात्र, तरीही शेतकरी आपल्या हक्काच्या पाण्यावर ठाम होते. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचा प्रयत्न केला असता, महिला पोलीस आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत २ तारखेला कालवा समितीची बैठक होणार असल्याचे सांगितले. मात्र, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
