भाजपचं एक पाऊल मागे, शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर?

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधीपक्षात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी 'प्रेशर टॅक्टिक्ट्स' अर्थात दबावतंत्र म्हणून भाजपने सेनेला ऑफर दिल्याची चर्चा आहे.

भाजपचं एक पाऊल मागे, शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला 180 अंशात कलाटणी देणारं वृत्त समोर येत आहे. भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दाखवल्याचं वृत्त ‘लोकसत्ता’ दैनिकाने दिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत ‘महासेनाआघाडी’च्या वतीने सत्तास्थापनेचा दावा करण्याची अंतिम जुळवाजुळव केली असतानाच भाजपने प्रस्ताव देण्याची खेळी (BJP offer to Shivsena) केली आहे. त्यामुळे शिवसेनाच पेचात अडकण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची सत्तास्थापनेच्या दिशेने अंतिम वाटचाल सुरु आहे. ‘महासेनाआघाडी’ची बोलणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे सत्तेपासून दूर राहण्याच्या भीतीने भाजपने खडबडून जागं होत ‘मातोश्री’वर तडकाफडकी प्रस्ताव पाठवल्याचं बोललं जातं. भाजपच्या दिल्लीतील एका बड्या नेत्याने ही ऑफर दिल्याचा दावा ‘लोकसत्ता’ने केला आहे. परंतु असा कोणताही प्रस्तावा आला नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधीपक्षात जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘प्रेशर टॅक्टिक्ट्स’ अर्थात दबावतंत्र म्हणून भाजपने सेनेला ऑफर दिल्याची चर्चा आहे. महासेनाआघाडीचं सरकार दृष्टीक्षेपात असल्यामुळे ‘करो या मरो’ या स्थितीत असलेल्या भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेसोबत सत्तेचं समसमान वाटप करण्याची तयारी दर्शवल्याचं (BJP offer to Shivsena) चित्र आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं कोणतंही आश्वासन देण्यात आलं नव्हतं, असं भाजपने वारंवार स्पष्ट केल्यामुळे युतीत बिनसलं. परंतु राष्ट्रवादीने सर्व पत्ते ओपन करत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार सत्तेत येणार हे निश्चित केलं. त्यामुळे भाजपने सुरुवातीची अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊ करण्याची नवी खेळी केल्याचं ‘लोकसत्ता’चं वृत्त आहे. आता भाजपला शिवसेनेकडून उत्तराची प्रतीक्षा आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित?

भाजपच्या प्रस्तावामुळे शिवसेनेचीच कोंडी होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी आपल्याला खोटे पाडल्यानेच चर्चेची दारे बंद केल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. भाजपसोबत युती तोडल्यानंतर परतीचे दोर कापले गेले आहेत. त्यामुळे पुन्हा जुळवून घेताना कुरबुरी होणंही साहजिक आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची बोलणी बरीच पुढे गेल्यामुळे मागे फिरणं विश्वासघातकी ठरणारं आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला माघार घेणं ‘रिस्की’ ठरु शकतं.

काल काय घडलं?

दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका पार पडल्यानंतर आघाडीची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत झालं असून मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही, असं स्पष्ट केलं. त्यानंतर रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जवळपास 1 तास 10 मिनिटं चर्चा केली.

आज काय घडणार?

मुंबईत आज सकाळी 11 वाजता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. संध्याकाळी चारच्या सुमारास काँग्रेसच्या आमदारांची विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडला जाईल.

महासेनाआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणूगोपाल मुंबईत येणार आहेत. BJP offer to Shivsena

संबंधित बातम्या : 

काँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही : पृथ्वीराज चव्हाण

महाआघाडीची गाडी सुसाट, आता ब्रेक नाही : संजय राऊत

महासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI