अर्ध्या एकरावर 45 प्रकारच्या विदेशी भाज्या; फॉरेनच्या भाजीपाल्यामुळे दरमहा शेतकरी कमावतो चांगला ‘पगार’
Exotic Vegetables Income : देशी-विदेशी भाज्या या शरीरासाठी आरोग्यदायी असतात. अनेक गावरान भाज्या तर औषधीपेक्षा अधिक गुणकारी असतात. या शेतकऱ्याने नेमकं हेच हेरत अर्ध्या एकरावर 45 प्रकारच्या विदेशी भाज्यांचे उत्पन्न घेतले आहे.

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : देशी-विदेशी भाज्या या शरीरासाठी आरोग्यदायी असतात. अनेक गावरान भाज्या तर औषधीपेक्षा अधिक गुणकारी असतात. या शेतकऱ्याने नेमकं हेच हेरत फॉरेनचा भाजीपाला ग्राहकांमध्ये लोकप्रिय केला. सुरुवातीला या शेतकऱ्याच्या उपक्रमाला ग्राहकांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर या भाज्यांचे गुणधर्म, त्याची रेसिपी याचे पॉम्पलेट छापून त्याने त्याची माहिती देताच हळूहळू ग्राहकांनी प्रतिसाद दिला. आता ग्राहक या शेतकऱ्याची वाट पाहतात. कोणती वेगळी भाजी बाजारात आणली याची विचारपूस करतात. विशेष म्हणजे या फॉरेनच्या भाज्यांनी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा मोठा स्त्रोत उपलब्ध करून दिला आहे.
बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये 45 प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमवत आहे.. त्यामुळे त्यांच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळवून दिले असून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालीया.. त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायची, विदेशात कशाला जायचे, ती तर बुलढाणा तालुक्यातही सहज उपलब्ध होईल..
सिनेमातून शेतीकडे




येळगाव येथील विष्णू गडाख यांचे B.A पर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात काम केले. विष्णू गडाख हे केवळ शेती व्यवसाय करीत नाहीत, तर विद्यादानाचेही कार्य करतात. अभिनयाची आवड त्यांना पूर्वीपासून आहे. देव माझा रोगावीचा चित्रपटात त्यांनी हरी पाटलाची, युग प्रवर्तक सावित्रीबाई फुले चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावली, हीच बायको पाहिजे, या चित्रपटात शिंदे गुरुजींचा अभिनय केला. पण मानधन सुद्धा त्यांना मिळाले नाही. सिनेमा क्षेत्रात मोबदला पाहिजे तसा मिळत नसल्याने गडाख यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतात भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला.
10 वर्षांपूर्वी केला प्रयोग
देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा 10 वर्षापूर्वी निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. ग्राहक येऊन भाजीपाला बघत, परदेशी भाज्यांची माहिती घेत. पण विकत घेत नसत. तर काही जण केवळ दुरूनच या भाज्या पाहात.
अन् एका आयडियाने केली कमाल
या समस्येवर मग गडाख यांनी उपाय शोधला. त्यांनी भाज्यांची नावे, त्यांचे फायदे याचे पॉम्पलेट छापले. त्यानंतर रेसिपी कशी करावी. त्यासाठी काय वापरावे, त्याचे विविध पदार्थ कसे तयार करावे याचे माहिती देणारे पॉम्पलेट छापले. त्यांची ही कल्पना कामी आली. ग्राहकांना या भाज्यांची, रेसिपीची माहिती मिळाल्याने त्यांचा विश्वास वाढला. गडाख यांच्या भाज्यांना मागणी वाढली. आता तर ग्राहक त्यांची येण्याची वाट पाहतो.
महिना 30 हजारांची कमाई
10 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय आज लाखमोलाचे उत्पन्नाचे स्त्रोत बनला आहे. गडाख हे बाजारात स्वत: भाजीपाला विकतात. त्यामुळे त्यांना जास्त नफा मिळत आहे. अर्ध्या एकराच्या शेतात 45 प्रकारच्या विदेशी भाजीपाला लागवड करून यातील अनेक भाज्या विविध आजारावर गुणकारी आहेत हे पटवून देण्यासाठी google वरून माहितीपत्रक डाऊनलोड करत त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्यांना केवळ भाजीपाला विक्रीतूनच 30 हजारांची कमाई होते.