GST Reforms 2025 : आनंदवार्ता!कर कपातीनंतर तुम्हाला किती स्वस्तात मिळतील बाईक्स? बसेल आश्चर्याचा धक्का
Two Wheeler Cheaper : केंद्र सरकार दिवाळीपूर्वी जीएसटी 2.0 अंतर्गत कर रचनेत बदल करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे दुचाकीसाठी थेट 18 टक्क्यांचा जीएसटी लागू होईल. त्यामुळे दुचाकी इतक्या स्वस्त होण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार दिवाळीपर्यंत दुचाकीच्या किंमती कमी करण्याची योजना करत आहे. परिणामी छोट्या कार, बाईक आणि स्कुटरवरील सध्याचा 28-31 टक्क्यांचा GST कमी होईल. जीएसटी केवळ 18 टक्क्यांवर येईल. सध्याच्या किंमतीनुसार, पेट्रोल बाईक, दुचाकीवर सध्या 28 टक्के जीएसटी लावण्यात येतो. 350 सीसी ते त्यापेक्षा अधिक दुचाकी वाहनांवर 3 टक्क्यांचा अतिरिक्त सेस आकारण्यात येतो. त्यामुळे जीएसटी कर 31 टक्क्यांपेक्षा अधिक होतो. येत्या काळात कर कपातीमुळे ही किंमत आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
बाईकवालेच्या एका वृत्तानुसार, सरकार दिवाळीपूर्वी जीएसटी 2.0 अंतर्गत कर रचनेत बदल करण्याची तयारी करत आहे. दुचाकीवर थेट 18 टक्के जीएसटी लागू होईल. जवळपास 10 ते 13 टक्के कर कपात होईल. ऑटो क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून संकटातून जात आहे. बाईकला चैनीची, हौसेची वस्तू न मानता तिला सर्वसामान्यांचे वाहतुकीचे साधन मानण्याची मागणी हे क्षेत्र करत आहे. यापूर्वी SIAM ने 18 टक्के जीएसटीची शिफारस केली होती. त्याचा फायदा आता ग्राहकांना होईल. त्यांना स्वस्तात बाईक खरेदी करता येईल.
जीएसटी परिषदेत काय ठरणार?
जीएसटी परिषदेची बैठक ही येत्या 3-4 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी कोणती वस्तू कोणत्या टॅक्स स्लॅबअंतर्गत आणायची हे स्पष्ट होईल. कोणत्या वस्तूवर किती कर आकारायचे हे निश्चित होईल. अनेक वस्तूंवर जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. त्यात दुचाकी वाहन क्षेत्राला बुस्टर डोस मिळेल.
किती स्वस्त होईल दुचाकी?
एका उदाहरणावरून दुचाकीवरील कर कपातीचे गणित समजून घेता येईल. जर बाईकची किंमत 1 लाख रुपये आहे, तर त्यावर नवीन जीएसटी अंतर्गत 10 हजारांपेक्षा अधिक फायदा होईल. त्यात सणासुदीच्या ऑफर जर जोडली तर ग्राहकांना दुचाकी घसघशीत सवलत मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी सुधारणा होत असल्याने ग्राहकांनी सध्या वाहन खरेदीत हात अखडता घेतला आहे. त्यामुळे वाहन उद्योगाने जीएसटी परिषदेला आणि सरकारला लवकरात लवकर ही सुधारणा करण्याची गळ घातली आहे. त्यामुळे ग्राहक बुकिंगकडे वळतील आणि उत्पादन आणि विक्रीला अडथळा येणार नाही.
