एअर इंडिया विमान अपघात विमा कंपनीसाठीही मोठा झटका, जाणून घ्या किती कोटी द्यावे लागणार
न्यू इंडिया एश्योरेंस आणि टाटा एआयजी ही एअर इंडियाच्या विमानाची प्रमुख विमा कंपनी आहे. परंतु या मोठ्या जोखीमेची जबाबदारी आंतरराष्ट्रीय री-इंश्योरेंस मार्केटकडे हस्तांतरीत केली जाते. त्याचे नेतृत्व लंडनमधील एआयजी करत आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातामुळे संपूर्ण देशावर संकट कोसळले आहे. एअर इंडियाच्या या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा समावेश आहे. हा अपघात विमा कंपन्यांसाठीही मोठा झटका देणारा ठरणार आहे. विमा कंपन्यांना या अपघातानंतर मोठी भरपाई द्यावी लागणार आहे. २४९० कोटी रुपयांची भरपाई विमा कंपन्यांना द्यावी लागण्याची शक्यता आहे.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, न्यू इंडिया एश्योरेंस आणि टाटा एआयजी ही एअर इंडियाच्या विमानाची प्रमुख विमा कंपनी आहे. परंतु या मोठ्या जोखीमेची जबाबदारी आंतरराष्ट्रीय री-इंश्योरेंस मार्केटकडे हस्तांतरीत केली जाते. त्याचे नेतृत्व लंडनमधील एआयजी करत आहे. एअर इंडियाने आपल्या ३०० पेक्षा जास्त विमानांसाठी जवळपास १.६६ लाख कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीला केवळ पाच टक्के वाटा द्यावा लागणार आहे. उर्वरित ९५ टक्के वाटा आंतरराष्ट्रीय विमा कंपनीला द्यावा लागणार आहे.
विम्याची भरपाई दोन पद्धतीने होते. पहिला प्रकार असलेला हल इंश्योरेंसमध्ये विमानाच्या किंमतीनुसार भरपाई दिली जाते. या अपघातात हा आकडा २०० ते ३०० मिलियन डॉलर ( जवळपास १६६० ते २४९० कोटी रुपये) होऊ शकतो. दुसरा प्रकार पॅसेजंर लायबिलिटीमध्ये प्रवाश्यांची जोखीम आहे. प्रवाशांचा मृत्यू झाला किंवा ते जखमी झाले तर भरपाई द्यावी लागते. युरोपच्या मार्गावर ही रक्कम ५०० मिलियन डॉलर (जवळपास ४१५० कोटी) रुपये होऊ शकते. मॉन्ट्रियल कन्वेंशननुसार, विमान अपघातात प्रवाश्यांचा मृत्यू झाल्यास एअर लाईनला त्या व्यक्तीच्या परिवारास भरपाई द्यावी लागते. ही भरपाई वय, उत्पन्न आणि न्यायालयाने दिलेल्या निकषानुसार दिली जाते.
२०२० मध्ये कोझिकोडमध्ये एअर इंडिया विमानाचा अपघात झाला होता. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी विमा कंपन्यांनी पॅसेंजर लायबिलिटीनुसार ३१५ कोटी रुपयांची भरपाई दिली होती. परंतु अहमदाबाद अपघातात नुकसान खूप मोठे झाले आहे. त्यामुळे ही रक्कम २४९० कोटी रुपये जाऊ शकते. भारतीय एव्हिएशन विम्याच्या इतिहासात ही सर्वात मोठी रक्कम असणार आहे.