Elon Musk चे सीमोल्लंघन! 500 अरब डॉलर कमावणारा जगातील पहिला व्यक्ती
Elon Musk Networth : जगातील अब्जाधीश, एक्स, टेस्ला, स्पेसएक्स अशा कंपन्यांचा मालक एलॉन मस्क याने सीमोल्लंघन केले आहे. त्याच्या कमाईच्या आकड्यांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिला उद्योगपती ठरला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क याने पुन्हा एकदा इतिहास रचला. 500 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असणारा तो जगातील पहिला उद्योगपती ठरला आहे. फोर्ब्स मासिकानुसार, टेस्लाचा शेअर गगनाला भिडला आहे. त्यामुळे मस्क याच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ दिसली. त्याची संपत्ती 500 अब्ज डॉलरच्या घरात पोहचली. त्यापूर्वी त्याच्या नावावर 300 अब्ज डॉलर, त्यानंतर 400 अब्ज डॉलरचा विक्रम नोंदवला गेला होता. तर एलॉन मस्क याच्यानंतर ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
500 अब्ज डॉलरची नेटवर्थ
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशच्या यादीनुसार (Forbes Real Time Billionaires) टेस्लाचे सीईओ आणि संस्थापक एलॉन मस्क यांची नेटवर्थ पहिल्यांदाच 500 अब्ज डॉलरच्या घरात पोहचली. फोर्ब्स श्रीमंतांच्या श्रीमंतीत किती भर पडली यावर लक्ष ठेवते. गेल्या काही दिवसांपासून टेस्लाचा शेअर सातत्याने उच्चांकावर आहे. त्यामुळे एलॉन मस्क याची संपत्ती वधारलेली आहे. शेअर बाजार बंद झाल्यावर मस्क याच्या संपत्तीत किंचित घसरली. तरीही हा आकडा 500 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे, भारतीय चलनात ही रक्कम 4,43,36,06,74,00,000 रुपये इतकी होते.
श्रीमंतीत किती झाली वाढ?
फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशच्या यादीनुसार बुधवारी एलॉन मस्क याच्या एकूण संपत्तीत 8.3 अब्ज डॉलरची भर पडली. त्यानंतर त्याची एकूण संपत्ती 499.1 अब्ज डॉलरवर पोहचली. 2020 पेक्षा त्याच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली. फोर्ब्सनुसार 2020 मध्ये त्याची नेटवर्थ 25 अब्ज डॉलरच्याघरात होती. पण गेल्या 5 वर्षांत मस्क याच्या संपत्तीत 20 पट वाढ दिसली. तज्ज्ञांच्या मते, त्याच्या संपत्तीत अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
टेस्लाच्या शेअरमध्ये वाढ
बुधवारी टेस्लाच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसली. त्यामुळे एलॉन मस्कची संपत्ती ऐतिहासिक स्तरावर पोहचली. आकडेवारीनुसार, टेस्लाचा शेअर 3.31 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. हा शेअर 459.46 डॉलरवर पोहचला. व्यापारी सत्रात एकवेळ हा शेअर 462.29 डॉलरच्या घरात पोहचला. लवकरच कंपनीचा शेअर हा 500 डॉलरच्या घरात पोहचू शकतो. या शेअरमध्ये यंदा 21 टक्क्यांहून अधिकची उसळी आली आहे. ट्रम्प यांच्याशी बिनसल्यानंतर मस्क याच्या अडचणी वाढल्या असल्या तरी श्रीमंतीत वाढ होत आहे.
