चिदंबरमनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला! सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री कोण?

देशातील एका माजी अर्थमंत्र्याला तब्बल 10 वेळा बजेट सादर करण्याची संधी मिळाली. हा अनोखा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे

चिदंबरमनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला! सर्वाधिक वेळा बजेट सादर करणारे अर्थमंत्री कोण?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (शनिवार 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटचं वाचन सकाळी 11 वाजता सुरु होईल. कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमन यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत. (Finance Minister Budget Maximum Time)

संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी प्रत्येकाची नजर अर्थमंत्र्यांवर खिळलेली असते. अर्थसंकल्पाच्या आधी अर्थमंत्र्यांच्या बोलण्यातून, कृत्यातून अर्थसंकल्पाचे ‘अर्थ’ काढण्याचा प्रयत्न केला जातो. बजेटच्या दिवशी देशात अर्थमंत्र्यांपेक्षा मोठा दुसरा कोणी सेलिब्रिटी नसतो, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांसह संसदेच्या पायर्‍या चढतात, तेव्हा हे दृष्य टिपण्यासाठी हजारो कॅमेरे आसुसलेले असतात.

अर्थसंकल्प सादर करणे हा कोणत्याही अर्थमंत्र्यासाठी आयुष्यभरासाठी अविस्मरणीय दिवस असतो. एखाद्याला ही संधी एकदाच मिळते, कोणाला पूर्ण पाच वर्ष. मात्र देशातील एका माजी अर्थमंत्र्याला तब्बल 10 वेळा बजेट सादर करण्याची संधी मिळाली. हा अनोखा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. मोरारजींनी देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प सर्वाधिक म्हणजे दहा वेळा सादर केले.

बजेट लाईव्ह अपडेट्स इथे पाहा : Budget 2020 : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचे डोळे

अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट सादर केलं होतं. हे अंतरिम बजेट होतं. यानंतर मोरारजी देसाई हे जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक आहे पी चिदंबरम यांचा. चिदंबरम यांनी संसदेत 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्रिपदी असताना संसदेत 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला.

महिला अर्थमंत्री

1969 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री झाल्या. मात्र निर्मला सीतारमन यांना पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री ठरण्याचा मान मिळाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.

यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सीडी देशमुख यांनी प्रत्येकी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केला. डॉ. मनमोहनसिंग यांना सहा वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 5 वेळा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममधील अखेरचं बजेट (अंतरिम बजेट 2019) पियूष गोयल यांनी सादर केलं होतं. 5 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपलं पहिलं बजेट सादर केलं.

राजीव गांधींचा आगळा-वेगळा विक्रम

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्ही. पी. सिंग यांच्या पक्षातून फुटल्यानंतर 1988-89 चा अर्थसंकल्प सादर केला. अशाप्रकारे आई आणि आजोबांनंतर अर्थसंकल्प सादर करणारे ते तिसरे पंतप्रधान ठरले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 6 अर्थसंकल्प सादर केले. मात्र पंतप्रधानपदी असताना त्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही. हे काम त्यांनी आपल्या अर्थमंत्र्यांकडे सोपवले होते. मात्र 10 वर्ष पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांची छाप बजेटवर पडलेली असायची. (Finance Minister Budget Maximum Time)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI