सोन्याचा वाढला तोरा! इस्त्रायल-इराण तणावात तुफान घोडदौड, तेजीचे सत्र कायम राहणार?
Gold Price Today : इस्त्रायल आणि इराण या दोन देशातील तणावामुळे जागतिक बाजारात सोन्याने महागाईचा उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारात सोने 3,400 डॉलर प्रति ट्रॉय औसवर पोहचले आहे. तर भारतात सोन्याने अनेक ठिकाणी पुन्हा लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

सोन्याने पुन्हा आकाशी झेप घेतली आहे. शुक्रवारी MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याने फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये पहिल्यांदा 1 लाखांचा टप्पा ओलांडला. सोने 2,011 रुपये म्हणजे 2.04% उसळले. सोने आता 1,00,403 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर तिकडे चांदीत तेजी कायम आहे. जुलै डिलिव्हरी चांदीचा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 810 रुपयांनी म्हणजे 0.76% वधारून 1,06,695 रुपये प्रति किलोवर पोहचला. इराण आणि इस्त्रायलमध्ये ताण तणाव वाढत असल्याने सोने आणि चांदी चमकले आहेत. मधय पूर्वेत परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी, गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. याशिवाय डॉलर इंडेक्समध्ये सुद्धा घसरण दिसल्याने सोने आणि चांदीची चमक वाढली आहे.
मध्य पूर्व देशात काय स्थिती?
शुक्रवारी भल्या पहाटेच इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्याचे सांगितले. तर दुसरीकडे तेहराणमधून सुद्धा धमाके झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणमधील न्युक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॅलेस्टिक मिसाईल ठिकाण्यांना इस्त्रायने लक्ष्य केले. या नवीन घडामोडींमुळे जग पुन्हा धास्तावले आहे. मध्य-पूर्व देशात तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे क्रूड ऑईलच्या पुरवठ्यावर पण प्रश्नचिन्ह उभं ठाकले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्त्वाच्या रस्त्याविषयी चिंता वाढली आहे. तिथूनच कच्चे इंधनाचा पुरवठा केला जातो. या तणावामुळे सोन्याला ग्लोबल मार्केटमध्ये मागणी वाढली आणि सोन्याच्या किंमती वाढल्या. जागतिक बाजारात सोने 3400 डॉलर प्रति ट्रॉय औसच्या पुढे पोहचले आहे. भारतात ही वायदे बाजारात सोन्याने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
गुरूवारी काय झाले?
गुरूवारी सोने आणि चांदीने स्थानिक आणि जागतिक बाजारात जोरदार प्रदर्शन केले. MCX वर ऑगस्ट डिलिव्हरी सोने 1.75% वधारून 98,392 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर जुलै महिन्यातील चांदीच्या वायद्यात 0.47% वाढीसह हा भाव 1,05,885 रुपये प्रति किलोवर पोहचला.
तर सोन्यात तेजीचे सत्र
पृथ्वी फिनमार्ट कमोडिटी रिसर्चचे प्रमुख मनोज कुमार जैन यांच्या मते सोने सध्या 6 आठवड्यांच्या विक्रमी उंचीवर आहे. जर जागतिक बाजारात सोने 3,400 डॉलरपेक्षा अधिक उसळले तर यामध्ये अजून तेजी येऊ शकते. आजच्या सत्रात सोने आणि चांदीत चढउतार दिसून आला. पण सोने 3,330 डॉलर तर चांदी 35 डॉलरसह टिकू शकते. तर ऑगमॉन्ट रिसर्च की हेड, रेनिशा चैनानी यांनी सध्याच्या घडामोडी कायम राहिल्या तर सोने लवकरच 1,05,000 रुपयांपर्यंत झेप घेईल असे म्हटले आहे.