Gold Rate Today : या आठवड्यात सोने 1910 रुपयांनी महाग! जाणून घ्या किंमती काय?
Gold Rate Today : देशात सोन्याच्या किंमतीवर स्थानिक आणि जागतिक घडामोडींचा, घटकांचा प्रभाव पडतो. या आठवड्यात सोन्याने मोठी झेप घेतली. सोने 1910 रुपयांनी महाग झाले. जाणून घ्या काय आहेत किंमती?

सोन्यात तेजीचे सत्र कायम आहे. या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याने 1910 रुपयांची भरारी घेतली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1750 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. मेट्रो शहरांसह ग्रामीण भागातील सराफा पेढ्यांवर दोन्ही धातुनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आता ग्राहक सोने खरेदीसाठी कमी आणि मोडण्यासाठी जास्त प्रमाणात येत आहे. काही जण जुने सोने मोडून नवीन दागिने पण करत आहेत. त्यात त्यांचा फायदा होत आहे. काही जण दागदागिने करण्यापेक्षा ठोक सोने खरेदीवर भर देत आहे. अनेक जण सोन्याच्या वाढत्या किंमती म्हणजे मंदीची नांदी असल्याचा दावा करत आहेत.
सोन्याची आयात वाढली
देशाने सोन्याची आयात करण्यात नवीन रेकॉर्ड केला आहे. मार्च महिन्यात 192.13 टक्क्यांनी वाढ होऊन सोन्याची आयात 4.47 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सोने आयात 27.27 टक्के वाढली. ती 58 अब्ज डॉलरवर पोहचली. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा आकडा 45.54 अब्ज डॉलर इतका होता.




सोन्याची मोठी भरारी
या आठवड्यात सोने सुरुवातीचे दोन दिवस घसरले. किंमती 500 रुपयांच्या जवळपास स्वस्त झाल्या. त्यानंतर सोन्याला विशेष झळाळी आली. 16 एप्रिल रोजी 990 रुपये, तर 17 एप्रिल रोजी सोने 1140 रुपयांची भरारी घेतली. तर 18 एप्रिल रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 89,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने दाखवली चमक
यापूर्वी चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर चांदीत घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसात चांदीने दरवाढीचा चंग बांधला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 94,910, 23 कॅरेट 94,530, 22 कॅरेट सोने 86,938 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 71,183 रुपये, 14 कॅरेट सोने 55,522 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,151 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.