कर्ज काढून घर घ्यावं, की किरायाने राहणेच योग्य? नेमका फायदा कशात? जाणून घ्या!
आजकाल बँका लाखो रुपयांचे कर्ज देऊन तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात. मात्र हेच कर्ज कधीकधी जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळेच काही लोक अजूनही भाड्याच्या घरात राहणंच पसंत करतात.

Home Loan Or Rent House : प्रत्येकालाच आपलं स्वत:चं एक घर असावं असं वाटतं. स्वप्नातल्या या घरासाठी अनेकजण धडपडत असतात. आजकाल बँका लाखो रुपयांचे कर्ज देऊन तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात. मात्र हेच कर्ज कधीकधी जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळेच काही लोक अजूनही भाड्याच्या घरात राहणंच पसंत करतात. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणं योग्य की कर्ज काढून स्वत:च्या घरात राहणं चांगलं आहे? हे जाणून घेऊ या….
ईएमआय आणि किराया यांची तुलना
घर घेण्यासाठी अनेकजण बँकेकडून कर्ज घेतात. याच कर्जाची परतफेड म्हणून तुम्हाला नंतर प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेला द्यावी लागते. त्यालाच ईएमआय म्हटले जाते. घर खरेदी करताना बरेच लोक ईएमआय आणि घराचे भाडे किती आहे? अशी तुलना करतात. आपण घरभाडे जास्त भरत असू तर त्यापेक्षा स्वत:चं घर खरेदी करून ईएमआय भरू असा विचार अनेकजण करतात. पण ईएमआय आणि घराचे भाडे यांची तुलना करणे अनेकवेळा चुकीचे ठरू शकते.
कर्ज काढून घर खरेदी केल्यास…
भविष्यात घरभाड्यात वाढ होते. त्यामुळे घरभाडे आणि ईएमआय यांच्यातील फरक कमी होत जातो. त्यामुळे एका अर्थाने ईएमआय आणि घरभाडे यांचा विचार करून कर्ज घेऊन घर खेदी करणे योग्य ठरू शकते. पण कर्ज काढून घर खरेदी केल्यास तुम्हाला पुढची 20 ते 25 वर्षे ईएमआय भरावा लागतो. भविष्यात तुमच्याडून ईएमआय भरण्यात कसूर झाल्यास बँक तुमच्या घराची निलामीही करू शकते. या बाबीचाही विचार करणे गरजेचे आहे.
घर खरेदी केल्यानंतर कोणत्या अडचणी येऊ शकतात?
घर खरेदी केल्यानंतर अनेकदा वेगवेगळ्या अडचणी नव्याने उभ्या राहतात. तुम्ही खासगी क्षेत्रात काम करत असाल तर कंपनी बदलल्यानंतर तुमचे ऑफिस कदाचित घरापासून दूर असू शकते. त्यामुळे तुमचा प्रवासात वेळ तसेच पैसा जाऊ शकतो. तुम्ही किरायाने राहात असाल तर तुमच्या जॉबच्या ठिकाणानुसार घर बदलण्याची संधी तुमच्याकडे असते.
नेमका कोणता निर्णय योग्य?
याच सर्व कारणांमुळे कर्ज काढून घर घ्यावं का? किंवा किरायानेच राहावे? असे प्रश्न उपस्थित केले जातात. तुम्ही खासगी क्षेत्रात काम करत असाल तर कर्ज काढून घर खरेदी करताना थोडा विचार केला पाहिजे. कारण खासगी क्षेत्रात जॉब कधी जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाल्यानंतर घराचा ईएमआय भरणे कठीण होऊ शकते. पुरेसे पैसे जमा झाल्यावरच घर खरेदी करण्याचा निर्णय घेणे योग्य आहे. विशेष म्हणजे नोकरी गेली किंवा अचानक आणीबाणीची परिस्थिती आल्यास तुमच्या सेव्हिंगमधून किंवा तुम्ही जमा केलेल्या संपत्तीतून घराचे कर्ज फेडण्याची कुवत जेव्हा निर्माण होईल, तेव्हाच घर खरेदी करण्याचा निर्णय घेणे हे हिताचे ठरते.
