LIC ची जबरदस्त योजना! दररोज १५० रुपये गुंतवा अन् १९ लाख मिळवा
सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मुलांसाठी एलआयसीची खास योजना चर्चेत आहे. यात तुम्ही दररोज १५० रुपये गुंतवून १९ लाख रुपयांचा निधी मिळवू शकता.

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी खास योजना आणत असते. सध्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मुलांसाठी एलआयसीची खास योजना चर्चेत आहे. यात तुम्ही दररोज १५० रुपये गुंतवून १९ लाख रुपयांचा निधी मिळवू शकता. याचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी करु शकता. एलआयसीची ही खास योजना नेमकी काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन
एलआयसीच्या या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज सुमारे १५० रुपये गुंतवले तर तुम्ही १९ लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करू शकता. LIC च्या योजनेचे नाव न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन असे आहे. ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग स्कीम आहे. यामध्ये मूल ० ते १२ वर्षांच्या दरम्यान असताना तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. यातील पैसे तुम्ही त्याच्या भविष्यासाठी वापरू शकता.
१९ लाख रुपये कसे तयार होतील?
न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन या योजनेत तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्मापासून दररोज १५० रुपये गुंतवले तर दरमहा तुम्हाला सुमारे ४५०० रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम एका वर्षात सुमारे ५५,००० रुपये होईल. या योजनेत २५ वर्षे नियमितपणे गुंतवणूक केल्यास, तुम्ही सुमारे १४ लाख रुपये गुंतवाल. त्यानंतर ही पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर मिळणारा बोनस आणि व्याज जोडल्यानंतर, तुम्हाला १९ लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळेल. ही रक्कम तुम्ही शिक्षण किंवा लग्नासाठी वापरू शकता.
प्रीमियम पेमेंट पर्याय
एलआयसीच्या न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक योजनेत प्रीमियम पेमेंटबाबत बरेच पर्याय मिळतात. तुम्ही तुमचा प्रीमियम मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक कालावधीसाठी भरू शकता. म्हणजेच तुम्ही तुमच्या बजेट आणि उत्पन्नानुसार गुंतवणूक करू शकता.
पैसे परत कधी मिळणार?
या योजनेअंतर्गत जेव्हा तुमचे मूल १८, २०, २२ आणि २५ वर्षांचे होते, तेव्हा गुंतवणुकीच्या रकमेचा काही भाग परत केला जातो. १८, २० आणि २२ वर्षांच्या वयात विमा रकमेच्या २०% रक्कम परत करता येतो. २५ वर्षांच्या वयात, उर्वरित ४०% रक्कम बोनससह दिली जाते.जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला, तर नॉमिनी व्यक्तीला एक निश्चित रक्कम दिली जाते. ही रक्कम भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किमान १०५% असेल.
या योजनेवर कर्ज घेता येईल का?
न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक या योजनेअंतर्गत पॉलिसी खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी कर्ज सुविधा दिली जाते. हे कर्ज मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर गरजांसाठी वापरले जाऊ शकते. म्हणजे तुम्ही पॉलिसी न मोडता हे पैसे वापरू शकता.