LPG बाबत केंद्राचा मोठा निर्णय, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नागरिकांना फायदा; आता थेट…

LPG Supply : देशातील नागरिकांना एलपीजी संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार उपाययोजना करत आहे. अशातच आता सरकारने LPG ची स्पॉट खरेदी सुरू केली आहे.

LPG बाबत केंद्राचा मोठा निर्णय, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नागरिकांना फायदा; आता थेट...
lpg spot buying
Image Credit source: Google
| Updated on: Apr 25, 2026 | 4:20 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अजूनही कायम आहे, यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. देशाच्या काही भागात थोड्या फार प्रमाणात एलपीजीचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सरकार पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशातील नागरिकांना एलपीजी संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार उपाययोजना करत आहे. अशातच आता भारताने थेट स्पॉट मार्केटमधून LPG खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आखातातून होणारा LPG पुरवठा कमी झाल्यानंतर सरकारकडून आता हा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारी तेल कंपन्या (OMCs) आता अमेरिका सारख्या देशांकडून अतिरिक्त LPG कार्गो खरेदी करत आहेत, जे जून-जुलैपर्यंत भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

भारताला किती LPG लागतो?

भारतामध्ये दररोज सुमारे 80,000 टन LPG ची गरज असते. महत्त्वाची बाब म्हणजे भारताने आपली देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवली आहे. पूर्वी देशांतर्गत उत्पादन कमी होते, जे आता वाढून दररोज सुमारे 46,000 टन झाले आहे. तरीही मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे. पूर्वी भारताच्या जवळपास 90% LPG पुरवठा खाडी देशांमधून म्हणजेच UAE, कतार, सौदी अरेबिया या देशांमधून येत होता. मात्र, आता सरकारने धोरण बदलत आयातीचे स्रोत वाढवले आहेत. आता या यादीत अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया यांसारख्या देशांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी 10 देशांकडून आयात केली जात होती, आता ती वाढवून 15 देशांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुबलक एलपीजी उपलब्ध होत आहे.

पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गॅसचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सुमारे 8 लाख टन LPG आयात आधीच निश्चित करण्यात आली आहे. अलीकडेच 10 जहाजे भारतात पोहोचली, त्यापैकी 9 जहाजांमध्ये स्वयंपाकाचा गॅस होता. यावरून सरकार पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

स्पॉट खरेदी म्हणजे काय?

कोणताही देश एखाद्या वस्तूचा व्यापार करण्यासाठी त्याबाबत इतर देशांसोबत करार करतो. या करारात किंमत आणि पुरवठा आधीच निश्चित केलेला असतो. मात्र स्पॉट खरेदीमध्ये तातडीच्या गरजेनुसार बाजारातून लगेच खरेदी केली जाते. सध्या अचानक पुरवठ्यात कमतरता निर्माण झाल्यामुळे भारत स्पॉट खरेदी करत आहे. सामान्या लोकांना एलपीजीची कमतरता जाणवू नये म्हणून ही खरेदी केली जात आहे.

 

Follow Us