स्वस्ताई आली… मुंबईकरांना गुड न्यूज… CNG, PNGच्या दरात घट; किती दर घटले?
महानगर गॅस लिमिटेडने मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने मुंबई आणि उपनगरातील सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. काल मध्यरात्रीपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : मुंबईकरांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL- Mahanagar Gas Limited) मुंबई आणि उपनगरात सीएनजीचे दर 3 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी केले आहेत. तसेच घरगुती पीएनजीचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील सीएनजीच्या किमती 76 रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या आहेत. तर घरगुती पीएनजीचे दर 47 रुपये झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाईने उसळी घेतलेली असतानाच मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने नव्या दराचे आदेश 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आणि 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीत 8 आणि पीएनजीच्या किंमतीत 5 रुपये प्रति एससीएमची कपात केली होती. त्यामुळे तेव्हा सीएनजीचे दर 79 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते. तर पीएनजीचे दर 49 रुपये झाले होते. त्यापूर्वी मुंबईत सीएनजीचे दर 87 रुपये किलोग्रॅम होते तर पीएनजीचे दर 54 रुपये प्रति एससीएम होते. एप्रिलनंतर सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करून महागनगर गॅस लिमिटेडने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.
सामान्यांना फायदा होईल
महानगर गॅस लिमिटेडच्या या निर्णयाने मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसारख्या बड्या शहरांमध्ये सीएनजीवर मोठ्या प्रमाणावर गाड्या चालतात. त्यामुळे महानगर गॅसने दर कमी केल्याने त्याचा सामान्य माणसांनाच थेट फायदा होणार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिलिंडर गॅस महागला
दरम्यान, काल केंद्र सरकारने 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढवली आहे. 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीच वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
