Success Story : जोडप्याने लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् घरातूनच सुरू केला व्यवसाय, उभी केली 46.6 कोटींची कंपनी, जाणून घ्या त्यांचे बिझनेस सीक्रेट
चेन्नईतील नलिनी आणि आनंद भारद्वाज यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून अवघ्या 2,000 रुपयांत घरातून फूड बिझनेस सुरू केला.छोट्या सुरुवातीपासून उभ्या राहिलेल्या कंपनीची वार्षिक उलाढाल आता 46.6 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.जाणून घ्या त्यांचे बिझनेस सीक्रेट

फक्त 2,000 रूपये खिशात घेऊन व्यवसाय सुरू करणं आणि पुढे त्याच व्यवसायाचा कोट्यांवधींचा ब्रँड उभा करणं…हे ऐकायला एखाद्या चित्रपटाची गोष्ट वाटेल. पण चेन्नईमधील नलिनी आणि आनंद भारद्वाज या जोडप्याने हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी होती. मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी घरातूनच पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थ बनवण्यास सुरूवात केली आणि त्यातून 46 कोटींचा डोलारा उभा केला.
पावसाळ्यात सुचली व्यवसायाची कल्पना
नलिनी आणि आनंद यांना खाण्याची विशेष आवड होती. 2015 मध्ये दिवाळीच्या सुमारास चेन्नईमध्ये पाऊस पडत असताना त्यांना त्या पावसात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली. बाजारात अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध होते. मात्र त्यांना आजीच्या हातची चव नव्हती.त्या जुन्या पदार्थांमध्ये असणारी शुद्धता कुठेतरी हरवल्यासारखी त्यांना वाटत होती. याचा विचारातून त्यांनी स्वत:चा ‘स्वीट करम कॉफी’ हा ब्रँड उभा केला.
विशेष म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी सुरूवातीला फक्त 2,000 रूपयांची गुंतवणूक केली. घरातील एका छोट्या जागेतून त्यांनी कामाला सुरूवात केली. सुरूवातीला मोठं ऑफिस, मोठी टिम किंवा जाहिरांतीसाठी मोठं बजेट असं काहीचं नव्हतं. घरातून पदार्थ तयार करणे,ऑर्डर घेणे, ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि स्वत:च जाहीरा करणे. अशी कामे त्यांनी सुरूवातील स्वत:केली.
दोघांनीही नोकरी सोडली
आनंद यांनी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये काम केले. त्यांच्याकडे इंजिनीअरिंग आणि MBA ची पदवी आहे. तर नलिनी यांनी बीटेक आणि MBA चे प्रशिक्षण घेतले होते. व्यवासायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर नलिनी यांनी 2021 मध्ये नोकरी सोडली. आनंद यांनी सुद्धा राजीनामा दिला आणि दोघांनी मिळून स्वीट करम कॉफी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा विस्तार केला.
कोरोनाच्या काळात व्यवसाय वाढला
या ब्रँडची खासियत म्हणजे पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थ. मद्रास मिक्सचर, अथिरम, स्वीट मुरूक्कू अशा पदार्थांपासून त्यांनी सुरूवात केली. सुरूवातीला ओळखीच्या लोकांनी, नातेवाईंकांच्या ऑर्डर्स आल्या. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात घरबसल्या खाद्यपदार्थ मागवण्याचं प्रमाणं वाढलं आणि त्यांच्या व्यवसायालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अनेक वेळा चढ उतार आले. कंपनीच्या या टिममध्ये आता 35 सदस्य काम करत आहेत.
घरगुती व्यवसाय जगभर पोहोचला
2022 मध्ये त्यांनी देशभरात, परदेशात ऑर्डस पोहोचवल्या. हळूहळू छोट्या घरात सुरू झालेल्या व्यवसायाचा विस्तार देशभर आणि परदेशातही झाला. आज त्यांच्याकडे 60 पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आहेत. अमेरिका, ब्रिटन, मध्यपूर्वेतील देशांमध्ये उत्पादनांची मागणी वाढली. गेल्या दोन वर्षांत कंपनीने 3 लाखांहून अधिक ऑर्डरी पूर्ण केल्या. तसेच 30 हून अधिक देशांमध्ये पदार्थ पोहोचवले.
फक्त 2,000 रूपयांच्या भांडवलातून सुरू झालेला हा व्यवसाय 2022 पर्यंत मिलियन डॉलरच्या टप्प्यावर पोहोचला. जून 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कंपनीला फायरसाईड व्हेंचर्सकडून 12.5 कोटी रूपयांची गुंतवणूकही मिळाली. आता हीच कंपनी वर्षभरात 46.6 कोटींचा व्यवसाय करत आहे
