Sugar Price Hike : साखरेचा पुन्हा भडका! आता एक किलो साखर कितीला? गृहिणींच्या तोंडचं पाणी पळालं
साखर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सण नसतानाही देशातील प्रमुख शहरांमध्ये साखरेचे दर 60-70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात किमती 30% वाढल्या आहेत. सरकारचे नियंत्रण प्रयत्न आणि उपाययोजना निष्प्रभ ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारभाव वाढ हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

सर्व सामान्यांच्या तोंडचं पाणी पळवणारी बातमी आली आहे. सणसूद नसतानाही साखर महागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून साखर सातत्याने महाग होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलूनही साखरेचे दर गगनाला भिडताना दिसत आहेत. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा साखर 60 ते 70 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
देशाच्या वेगवेगळ्या महानगरात आणि मोठ्या शहरांमध्ये साखरेचे दर वाढत असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. कोलकात्यातील लोकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोलकात्यात साखरेचे दर 70 रुपये किलोवर गेले आहे. तर राजधानी दिल्लीत 64 रुपये किलोने साखर विकली जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये एकसमान परिस्थिती आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये साखर 63 रुपये किलोने विकली जात आहे. या बड्या शहरांच्या तुलनेत चेन्नईत साखर थोडी स्वस्त आहे. चेन्नईत साखर 60 रुपये किलोनेच विकली जात आहे.
वर्षभरात 30 टक्क्याने उसळी
साखरेच्या भावात अचानक वाढ झालेली नाहीये. तर गेल्या एक वर्षात साखरेचे दर वाढत आहेत. आकड्यांवरून नजर फिरवली तर, गेल्या एक वर्षात साखरेच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. साखरेच्या किमती नियंत्रणात येतील असं लोकांना वाटत होतं, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. ताज्या आकडेवारी नुसार, गेल्या एक महिन्यातच साखरेच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखरेचे दर सातत्याने वाढत असल्याने अनेकांच्या किचनचं बजेट कोलमडलं आहे.
कठोर निर्णयही निष्प्रभ
महागाई अटोक्यात आणण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. बाजारात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि किंमती खाली आणण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारने अडीच लाख टन साखर आयातीचा कोटा दुसऱ्यांदा जारी केला आहे. बाजारात माल कमी पडू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच याच महिन्यात 90 टक्के कोटा विकण्याचे आदेशही सरकारने साखर कारखान्यांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर साखर कारखान्यांनीही यंदा वेगाने साखरेचे उत्पादन सुरू केलं आहे. त्यानंतरही किरकोळ बाजारात साखरेचे दर काही कमी होताना दिसत नाहीये.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव
साखर नियंत्रणासाठी देशांतर्गत मोठी पावलं उचलली जात आहे. मात्र, साखरेच्या वाढत्या दरामागे बाहेरचंही एक कारण आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढलेले आहेत. वैश्विक बाजारातील तेजीचा थेट स्थानिक किंमतीवर परिणाम होत असतो. एकीकडे साखर कारखान्यांनी लवकर उत्पादन सुरू करणं आणि सरकारी कोटा जारी होणं बाकी आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी तेजी आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना स्वस्तातील साखरेसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. कारण साखरेचे भाव कोसळण्याचे काहीच संकेत बाजारात दिसत नाहीये.
