वॉरेन बफेच्या पोटी शनि आला! 94 व्या वर्षी इतक्या छापल्या नोटा, अंबानी-अदाणींची तर गणतीच नाही
Warren Buffett Wealth : या वर्षात दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी पुन्हा कमाल केली आहे. जगभरातील श्रीमंतांच्या संपत्तीत घसरण होत असताना बफे यांच्या पोटी शनि आला आहे. त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न झाली आहे. त्यांनी या अडीच महिन्यात 21 अब्ज डॉलरची कमाई केली आहे.

यंदाचे वर्ष सोने आणि चांदी गुंतवणूकदारांना मालामाल करणारे ठरले. अमेरिकेत सत्तांतर झाले. बायडेन सरकार जाऊन डोनाल्ड ट्रम्प सरकार आले. त्यांच्या आक्रमक आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय धोरणांना जगभरात मोठी उलथापालथ झाली. शेअर बाजारात मोठी घसरण दिसली. जगातील दिग्गज श्रीमंताची संपत्ती झपझप कमी झाली. अब्जाधीश एलॉन मस्कच नाही तर भारतीय बडे उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना सुद्धा फटका बसला.
ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सननुसार वॉरेन बफे यांच्या संपत्तीत यावर्षी 21.5 अब्ज डॉलरची भर पडली. 164 अब्ज डॉलर म्हणजे अंदाजे 14.21 लाख कोटी भारतीय रुपयांसह ते श्रीमंतांच्या यादीत 6 व्या क्रमांकावर आहेत. या यादीत समाविष्ट 500 अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक फायदा त्यांनाच झाला आहे. ज्यांच्या संपत्तीत या वर्षात घसघशीत वाढ झाली आहे, अशा केवळ तीन अब्जाधीशांमध्ये त्यांचा समावेश आहे. हे तीनही अब्जाधीश टॉप 15 श्रीमंतात सहभागी आहेत.
कमाईची रेकॉर्डमागे काय गणित?
वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी उसळी दिसून आली. सध्या हे शेअर उच्चांकावर व्यापार करत आहेत. त्यामुळेच वॉरेन बफे यांना मोठा फायदा झाला आहे. यावर्षी हॅथवेच्या शेअरमध्ये 16% पर्यंत वाढ झाली आहे. तर नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 8% ची घसरण दिसून आली. कंपनीला चौथ्या तिमाहीत मोठा फायदा झाला. विमा व्यवसायात कंपनीने मोठी सुधारणा केली. त्यामुळेच यावर्षी शेअर खासा तेजीत आहेत.
या कंपनीकडे मोठी रोख रक्कम
बर्कशायर हॅथवेकडे 325 अब्ज डॉलर इतकी मोठी रोख आहे. बफे यांनी गेल्या वर्षी ॲप्पल आणि बँक ऑफ अमेरिकेला अब्जावधी डॉलरचे शेअर विक्री केले होते. ही रोख ॲप्पल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, ॲमेझॉन आणि एनव्हिडिया कॉर्प यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या एकूण रोखीपेक्षा अधिक आहे.
अंबानी-अदानींची परिस्थिती काय?
या वर्षी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत कोणतीही वाढ झाली नाही. उलट दोघांना या वर्षात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यंदा आतापर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती 2.77 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. ते 87.8 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील 17 वे सर्वाधिक श्रीमंत आहेत. तर गौतम अदानी यांना यंदा 7.09 अब्ज डॉलरचा फटका बसला. 71.6 अब्ज डॉलरसह अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 21व्या क्रमांकावर आहे.
