गृहकर्ज स्वस्त आणि पर्सनल लोन का असतं महाग? बँकांचे हे गणित तुम्हालाही हैराण करणार
Home Loan-Personal Loan: आजकाल कर्ज घेणे सामान्य झालं आहे. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज काढावे लागते. काहींना घरासाठी कर्ज हवं असतं. तर काहींना वैयक्तिक कामासाठी छोट्या रक्कमेची गरज असते. ते वैयक्तिक कर्ज घेतात. पण त्यातील व्याजदरात इतकी तफावत का असते?

Difference in Home Loan-Personal Loan: अनेकजण गरजा पूर्ण करण्यासाठी अथवा अडचणीत असताना कर्ज काढतात. कर्ज काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं आहे. स्पर्धेमुळे बँकाही आकर्षक ऑफर्स कर्ज देत आहेत. कोणी घरासाठी, काही जण वाहनांसाठी तर अचानक आलेल्या खर्चामुळे काही जण वैयक्तिक कर्ज घेतात. पण या कर्जांचा व्याजदर मात्र एक समान नसतो. वाहन कर्ज असा वा गृहकर्ज यांच्या व्याजदरात तफावत दिसते. तर वैयक्तिक कर्ज हे सर्वात महाग असते. काय आहे यामागील कारण?
वैयक्तिक कर्ज असते असुरक्षित
गृहकर्ज असो वा वाहन कर्ज याचा व्याजदर हा साधारणपणे 7 ते 9 टक्क्यांदरम्यान असतो. तर त्या उलट वैयक्तिक कर्जाचा व्याजदर हा 10 ते 25 टक्क्यांच्या घरात असतो. बँकांनी नाही दिले तर NBFC, वित्तीय संस्था आव्वाच्या सव्वा दराने कर्ज पुरवठा करतात. अनेकदा सिबील अथवा योग्य कागदपत्रांचा अभाव यामुळे वैयक्तिक कर्जासाठी मोठे व्याजदर आकारले जाते. केवळ आधार कार्ड आणि काही कागदपत्रांआधारे वैयक्तिक कर्ज मिळते.
पण वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज प्रकारात मोडते. तर त्याउलट गृहकर्ज आणि वाहन कर्ज हे सुरक्षित कर्ज प्रकारात मोडते. पर्सनल लोनचे व्याजदर अधिक असण्यामागे हेच मोठे कारण आहे. पर्सनल लोन परतफेडीची शक्यता बँकांना कमी वाटते. अनेकदा कर्जदार पूर्ण रक्कम फेडत नाहीत. पर्सनल लोन हे नेहमी कमी मुदतीचे असते. ते जास्त कालावधीचे नसते. तर वाहन कर्ज आणि गृहकर्ज हे दीर्घ मुदतीसाठी देण्यात येते. जोखिम अधिक असल्याने बँका वैयक्तिक कर्जाचा व्याजदर नेहमी चढाच ठेवतात. त्यामुळे वैयक्तिक कर्जासाठी सर्वसामान्यांना मोठी रक्कम चुकवावी लागते. त्याचा हप्ताही जास्त असतो.
वसुलीचा मोठा प्रश्न
गृहकर्जप्रकरणात बँकांकडे संपत्ती, मालमत्ता तारण असते. वाहन कर्जातही असाच प्रकार असतो. वाहनावर बोजा असतो. वाहनाचे हप्ते थकले तर एका निश्चित कालावधीनंतर हे वाहन ओढून घेऊन जाऊन त्याचा लिलाव करून बँक कर्ज वसूली करते. घरावर कर्ज दिले असेल तर ते घर बँकेकडे हप्ते फेड होईपर्यंत तारण असते. कर्ज थकल्यास अशा घरांची जप्ती करून बँका लिलाव करतात आणि त्यांच्या व्याजासह कर्जाची रक्कम वसूल करतात. पण वैयक्तिक कर्जात कोणतीच वस्तू तारण म्हणून ठेवण्यात येत नाही. त्यामुळे असे कर्ज हे कमी कालावधीसाठी आणि अधिक व्याजदराने देण्यात येते.
