महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कराडचा चारुदत्त साळुंखे UPSC ESE परीक्षेत देशात प्रथम

Yuvraj Jadhav

|

Updated on: Apr 13, 2021 | 2:18 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)अभियांत्रिकी सेवा परीक्षेत Mechanical Engineering विभागात कराडचा चारुदत्त मोहनराव साळुंखे (Charudatta Salunkhe) देशात पहिला आला आहे.

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कराडचा चारुदत्त साळुंखे  UPSC ESE परीक्षेत देशात प्रथम
चारुदत्त साळुंखे

Follow us on

सातारा: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल 2020 जाहीर केला आहे. या परीक्षेतील Mechanical Engineering विभागात कराडचा चारुदत्त मोहनराव साळुंखे देशात पहिला आला आहे. अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे 495 पदांची भरती होणार आहे. कराडच्या चारुदत्त साळुंखे यानं मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या कुटुबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. चारुदत्त साळुंखे हा भाभा रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून काम करत असतो. देशपातळीवर मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (UPSC Engineering Services 2020 Final Result Charudatta Salunkhe from Maharashtra Satate Satara Karad get first rank in Mechanical Engineering UPSC ES Result)

ग्रामीण भागातील विद्यार्थी काय करु शकतो हे चारुदत्त यांनी दाखवलं

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे होय. मूळचे चाफळ (ता.पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या चारुदत्त साळुंखे यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्या मंदिर कराड येथून पूर्ण झाले. पुढे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून घेत त्यांनी दहावीला 94.55 टक्के गुण मिळवले.

चारुदत्त साळुंखे याची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी

चारुदत्त साळुंखे हा खाजगी संस्थेत क्लार्क असणाऱ्या मध्यमवर्गीय मोहनराव साळुंखे आणि प्राथमिक शिक्षक असणाऱ्या संगिता साळुंखे यांचा मुलगा आहे. त्यानं दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण घेऊन शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली. दहावीनंतर SGM कॉलेज कराड येथून 92.33 टक्क्यांसह विज्ञान शाखेतून त्यानं बारावी पूर्ण केली. बारावी विज्ञान शाखेतूनच MHT-CET परीक्षेत 184 गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.

खासगी कंपनीमधील नोकरी हातात असून शासकीय सेवा निवडली

चारुदत्त साळुंखे CoEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असताना देखील खाजगी क्षेत्रात जॉब न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ज्या क्षेत्रात आपण राहतो त्या समाजाला पर्यायाने आपल्या देशाला फायदा होईल, अशा क्षेत्रात म्हणजेच शासकीय सेवेत अधिकारी होण्याचं ध्येय चारुदत्त यांनी बाळगलं. समाजाप्रती , देशाप्रती असणारी बांधिलकीच चारुदत्त साळुंखे यांना वेगळं ठरवते.

GATE 2020 मध्येही यश

शासकीय सेवांचा म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्निकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवत यशाच्या चारुदत्त साळुखे यानं नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या जोरावरच सबंध देशाच्या टेक्निकल क्षेत्राला दिशा देणाऱ्या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी त्याची निवड झाली. तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अनुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात. तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखती मधून चारुदत्त साळुंखे तावून सुलाखून संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झाले.

भाभा रिसर्च सेंटरमध्ये निवड, अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी

UPSC – IES ची मुख्य परीक्षा देखील चारुदत्त पास झाला होता. दरम्यानच्या काळात भाभा रिसर्च सेंटरची मुलाखत आणि UPSC मेन्स परीक्षाच्या अवघ्या एक महिना आधी चारुदत्तचे वडील कोरोनाशी झुंज देऊन घरी परतले होते. अशा कठीण प्रसंगातही संयम न गमावता कुटुंबियांची काळजी घेत त्यानं मेन्सची आणि मुलाखतीची तयारी पूर्ण केली. दरम्यानच्या काळात त्याची भाभा रिसर्च सेंटरमध्ये( BARC) मध्ये निवड झाली. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात UPSC च्या मुलाखतीसाठी तो पात्र ठरला.

Charudatta Salukhe Karad parents

चारुदत्त साळुंखे यांचे कुटुंबीय

आई-वडिलांना मुलाच्या यशाचा अभिमान

ग्रामीण भागाचा , आर्थिक परिस्थितीचा , कौटुंबिक गोष्टींचा अशा कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात न ठेवता ध्येयाच्या दिशेने झपाटल्यासारखी वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते हेच चारुदत्त साळुंखे यांच्या यशाचं गमक आहे. भाभा रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून काम करत असतानाच आज मिळालेले देशपातळीवर दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुलाने मिळवलेले यश हे अपेक्षित असून मुलाने हे यश मिळवुन आमचे पांग फेडले असल्याची प्रतिक्रिया चारुदत्तचे आई संगिता व वडील मोहनराव साळुंखे यांनी दिली

चारुदत्त हा विलक्षण पद्धतीने अभ्यास करायचा आम्ही घरातील लोक रात्री झोपून पहाटे उठत असू तोपर्यंत तो अभ्यास करायचा. आम्हाला सांगायला लागायचं की आता तू झोप अशी माहिती चारुदत्त ची बहिण अर्चना साळुंखे हिने दिली. चारुदत्तनं  मिळवलेले यश हे अत्यानंद देणारे असल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

संबंधित बातम्या:

UPSC Engineering Services 2020 Final Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा करा चेक

Bank Job 2021 : बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या 511 पदांवर भरती, असा करा अर्ज

(UPSC Engineering Services 2020 Final Result Charudatta Salunkhe from Maharashtra Satate Satara Karad get first rank in Mechanical Engineering UPSC ES Result)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI