शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश

महिला अत्याचारा विरोधात नियम कठोर करुनदेखील काही नराधम मुलींची छेड काढणं किंवा बलात्कारासारखं कृत्य करताना दिसत आहेत. या निघृण कृत्याचा मुली आणि महिलांच्या मनावर प्रचंड भयानक परिणाम पडतो.

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल, आई-वडिलांचा आक्रोश
शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल

बीड : महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दररोज प्रत्येक शहरात महिला अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात. विशेष म्हणजे महिला अत्याचारा विरोधात नियम कठोर करुनदेखील काही नराधम मुलींची छेड काढणं किंवा बलात्कारासारखं कृत्य करताना दिसत आहेत. या निघृण कृत्याचा मुली आणि महिलांच्या मनावर प्रचंड भयानक परिणाम पडतो. याशिवाय या घटनांमुळे महिला आणि मुली यांच्या मनात हतबलतेची भावना निर्माण होते. त्यातून त्या नैराश्यात जातात आणि आत्महत्या करुन स्वत:ला संपवून घेण्याचं टोकाचं पाऊल उचलतात. बीड जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही बीडच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी या गावात घडली आहे. या गावातील एक 30 वर्षीय तरुण हा शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीची सारखी छेड काढायचा. तिला वारंवार त्रास द्यायचा. या आरोपीचं नाव उमेश आश्रुबा क्षीरसागर असं आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिने शुक्रवारी (6 ऑगस्ट) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संपूर्ण गाव पीडितेच्या घराशेजारी गोळा झालं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गावात दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

आरोपीला बेड्या

या घटनेप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी शेजारच्या तरुणाविरोधात तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी उमेश आश्रुबा क्षीरसागर याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडितेनं खरंच आरोपीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली का की आणखी दुसरं काही कारण होतं याची चौकशी आता पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा :

औरंगाबादेत वर्दीतल्या पोलीस निरीक्षकाची दादागिरी, भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ-मारहाण, इतका माज येतो कुठून?

आईचा राग, धारदार शस्त्राने हल्ला, जन्मदाती जमिनीवर धारातीर्थ, रक्तबंबाळ वृद्ध मातेचा तडफडून मृत्यू, सातारा हादरलं !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI