Dombivali : ‘सोन्या’साठी सोन्यासारख्या मैत्रीत दिला दगा, मित्राचे 35 लाख रुपयाचे दागिने घेऊन झाला पसार
देशात अनेकदा अशा घटना घडत असतात. पण जवळच्या मित्राने दगाबाजी केल्यामुळे मित्राला अधिक वाईट वाटले आहे. पुण्यात असलेल्या आरोपीने अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

डोंबिवली : मैत्रीत दगाबाजी होत असलेली अनेक उदाहरण आपण पाहिलेली आहेत. डोंबिवलीमध्ये (Dombivali) सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. सोन्याच्या मोहापायी एका मित्रानेच मित्राची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. विश्वनाथ जगताप (Vishwanath Jagtap) असे या धोकेबाज मित्राचे नाव आहे. त्याने नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत डिस्प्लेवर लावण्यासाठी ज्वेलर्स मित्राच्या दुकानातून 35 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन लंपास केले होते. रामनगर पोलिसांनी (Ram Nagar Police) पुण्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सोने घेऊन पसार झालेला मित्र फोनला दाद देत नव्हता. पोलिसांनी त्याचं लोकेशन चेक करुन त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सोने देखील हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मित्राचे दागिने घेऊन झाला पसार
अजय जैन हे डोंबिवली पूर्वेत राहतात. त्यांचं सोन्याचं दुकानं आहे. अजय जैन याचा मित्र विश्वनाथ जगताप याने अजयला मी ही ज्वेलर्सचे दुकान सुरू केले असून डिस्प्लेला दाखवण्यात साठी सोने हवे असे सांगतले. मैत्रीवर विश्वास ठेऊन अजयने आपला मित्र विश्वनाथ जगताप याला नव्याने ज्वेलर्सच्या व्यवसायात उतरण्यासाठी 700 ग्राम वजनाचे 35 लाख रुपयाचे दागिने डीस्प्लेवर लावण्यासाठी दिले. मात्र हे सोनं मिळताच जगतापने आपल्या सोन्या सारख्या मित्राला दगा देत दुकान न उघडता किंवा दागिने परत न करताच पसार झाला. अनेकदा संपर्क साधूनही विश्वनाथ प्रतिसाद देत नसल्याने अखेर अजयने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास करताना रामनगर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू करत पुणे शहरात लपून बसलेल्या दगाबाज मित्र जगताप याला बेड्या ठोकत त्याच्याकडून 35 लाख रुपयाचे दागिने हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
मित्राने दगाबाजी केल्यामुळे मित्राला अधिक वाईट वाटले
देशात अनेकदा अशा घटना घडत असतात. पण जवळच्या मित्राने दगाबाजी केल्यामुळे मित्राला अधिक वाईट वाटले आहे. पुण्यात असलेल्या आरोपीने अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली होती. तसेच कॉल ही घेत नव्हता अखेर संतापलेल्या मित्राने पोलिसांचा आसरा घेतला.
