Badlapur News : धक्कादायक, बदलापूरमध्ये महिलांच्या अंडाशय तस्करीचं रॅकेट उघड, इंजेक्शन्स दिली जायची
Badlapur News : बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते.

मयुरेश जाधव, बदलापूर प्रतिनिधी : बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे. बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय.
त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते.
ती हे इंजेक्शन्स देत होती
गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं.
घरात काय सापडलं?
त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलय. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
