नवरा रात्रपाळीला गेला… तिने तीन मुलींसह रात्रीतच आयुष्य संपवलं; अखेरच्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलं?
पती रात्रपाळीस कामावर गेला असताना ही दुर्घटना घडली. 12,7, व 4 वर्षांच्या मुलींसह महिलेने आयुष्य संपवलं. मात्र त्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. काय लिहीलं होतं त्यात ?

भिवंडी शहरातील फेणे गाव या ठिकाणी हृदयद्रावक घटना घडली आहे. पती रात्रपाळी साठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यामुळे भिवंडी हादरली असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
रात्रपाळीवरून घरी परत आला आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार, त्याची पत्नी पुनिता (वय 32) व मुली नंदिनी (वय 12),नेहा (वय 07) व अनु (वय 04) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवून ही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
समोरचं दृश्य पाहून लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आत मध्ये छताच्या लोखंडी अँगल वर पत्नी आणि मुलींचे गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले आहेत.
आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेली चिट्ठी घटनास्थळी मिळाली आहे. महिलेने मुलींसह आत्महत्या नक्की का व कोणत्या कारणांमुळे केली हे अजून स्पष्ट नसले तरी पोलिस अनेक बाजूने या आत्महत्येचा तपास करण्यात गुंतले आहेत.
