एका स्क्रू ड्रायव्हरने गुन्हेगारांपर्यंत पोहोचवलं, १३ लाखांचा माल उडवणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक
भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह १३ लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने शहर हादरलं. पोलिसांनी कसून शोध सुरू केला. आणि एका सुगाव्यामुळे आरोपींचा पत्ता लागला आणि उलगडाही झाला.

निलेश डाहाट , TV9 मराठी प्रतिनिधी, चंद्रपूर | 5 ऑक्टोबर 2023 : चोरी किंवा गुन्हा करताना, एखादी छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणामुळे छोटासा तरी पुरावा मागे सुटतोच. हुश्शार पोलिस त्याच छोट्याशा क्लूच्या आधारे गुन्हेगारापर्यंत पोहोचतात. चित्रपटांमध्ये आपण हे अनेक वेळा पाहिलं असेल, पण असं प्रत्यक्षात, खरोखरही घडलंच. एका छोट्याशा क्लूमुळे पोलिसांनी मोठ्या चोरीचा उलगडा केला आणि चोरट्यांच्याही (thieves arrested) मुसक्या आवळत त्यांना गजाआड केलं. राजेंद्र उर्फ राजहंस दुर्गाजी भेदे (३० रा. शंकरपूर बोरखेडी), संतोष उर्फ मोनू गौतम निकोसे (३५ रा. रामबाग नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
भरदिवसा घर फोडत १३ लाखांचा माल लुटल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरजवळ घडल्याने शहर हादरलं. नागरिकांमध्ये भीतीचं एकच वातावरण पसरलं होतं. मात्र पोलिसांनी हार न मानात कसून शोध घ्यायला सुरूवात केली. आणि अथक प्रयत्नानंतर सराईत गुन्हेगारांना अटक केली. मुद्देमाली जप्त केला. त्यांच्या या कावाईचं मोठं कौतुक होत आहे.
स्क्रू ड्रायव्हर वरून लावला चोरांचा शोध
चंद्रपूरजवळच्या बल्लारपूर शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डात भरदिवसा हा गुन्हा झाला. राजेंद्र प्रसाद वॉर्डात शिवम वाघमारे यांचे घर आहे. कामानिमित्त त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. घरावर लक्ष ठेऊन असलेल्या चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेतला आणि ते घर फोडून आत शिरले. दिवसढवळ्या चोरी करत त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल लुटला आणि ते फरार झाले.
या चोरीमुळे हादरलेल्या वाघमारे यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. वाघमारे यांच्या घराचा पंचनामा करत असताना पोलिसांना घटनास्थळी एक पेचकस अर्थात स्क्रू ड्रायव्हर आढळला. हा पेचकस बल्लारपूर रेल्वे चौकातील दुकानातून विकत घेतल्याचा अंदाज पोलिसांना आला.
त्यावरून त्यांनी संबंधित दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे एका वाहनातून नागपूरला पसार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, दिलीप आदे, संतोष दंडेवार आदींचे पथक नागपुरात रवाना झाले. तेथून आरोपी राजेंद्र उर्फ राजहंस भेदे आणि संतोष उर्फ मोनू निकोसे या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मालही जप्त केला. या आरोपींवर वरोरा, वर्धा, नागपूर, सोनेगाव हुडकेश्वर, गोंदिया, भंडारा येथे गुन्हे दाखल आहेत.
