दाताच्या खाचेत गोल्ड प्लेटस बसवल्या, तोंडात सोन्याची चेन कोंबली, कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडलं 45 लाखांचं सोनं

Gold Smuggling | या दोन उझबेकिस्तानी नागरिकांनी सोन्याच्या तस्करीसाठी जी पद्धत वापरली होती, ती खरोखर थक्क करणारी होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांची कसून तपासणी केली तेव्हा या दोघांनी तोंडात सोने लपवल्याचे समोर आले.

दाताच्या खाचेत गोल्ड प्लेटस बसवल्या, तोंडात सोन्याची चेन कोंबली, कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडलं 45 लाखांचं सोनं
सोने तस्करी

नवी दिल्ली: अलीकडच्या काळात भारतामध्ये सोने तस्करीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. काही दिवसांच्या अंतराने देशातील एखाद्या विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी केले जाणारे सोने पकडल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. प्रत्येकवेळी सोने तस्करीसाठी काही ना काही नवी शक्कल लढवल्याचे समोर येते.

मात्र, यापैकी काहीजण अक्षरश: जीवावर उदार होऊन सोन्याची तस्करी करताना दिसतात. दिल्ली विमानतळावर शुक्रवारी असाच एक प्रकार समोर आला. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उझबेकिस्तानच्या दोन नागरिकांना ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 951 ग्रॅम सोन्याचा साठा जप्त केला. बाजारपेठेत या सोन्याची किंमत तब्बल 45 लाख रुपये इतकी आहे.

तोंडात कोंबून सोन्याची तस्करी

या दोन उझबेकिस्तानी नागरिकांनी सोन्याच्या तस्करीसाठी जी पद्धत वापरली होती, ती खरोखर थक्क करणारी होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांची कसून तपासणी केली तेव्हा या दोघांनी तोंडात सोने लपवल्याचे समोर आले. या दोघांच्या तोंडात सोन्याचे कृत्रिम दात बसवले होते. तसेच काही दात काढून त्या खाचेत सोन्याच्या प्लेटस बसवण्यात आल्या होत्या. याशिवाय, त्यांच्या तोंडात सोन्याच्या चेनही कोंबल्या होत्या.

जीन्स पँटवर सोन्याचा मुलामा देऊन तस्करी

काही दिवसांपूर्वी केरळच्या कन्नूर विमानतळावरील पिवळ्या रंगातील जीन्सची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती. विमानतळावर उतरलेल्या एका व्यक्तीच्या जीन्सवर पिवळ्या रंगाचा विचित्र वॉश होता. त्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी या जीन्समध्ये सोनं दडवल्याचा प्रकार समोर आला होता.

विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या (AIU) अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची जीन्स बारकाईने पाहिली तेव्हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ही जीन्स अत्यंत कलात्मकतेने तयार करण्यात आली होती. सोने दडवून ठेवण्यासाठी जीन्सची विशिष्ट प्रकारे रचना करण्यात आली होती. या जीन्समध्ये दोन वेगवेगळे थर होते. त्यामध्ये सोन्याची पेस्ट लावण्यात आली होती. सोन्याचा हा थर अत्यंत पातळ असल्याने तो एखाद्या रंगाप्रमाणे दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात या जीन्समध्ये 302 ग्रॅम म्हणजे साधारण तीन तोळे सोने लपवण्यात आले होते. सोन्याची पेस्ट मेटल डिटेक्टरमध्ये पकडली जात नाही. त्यामुळे सोन्याच्या तस्करीसाठी या नव्या पद्धतीचा उपयोग होत आहे.

संबंधित बातम्या:

आसामहून तेलंगणात सोने तस्करी, 24 किलो सोन्याच्या विटा जप्त, कोट्यावधींचं घबाड लपवण्याची शक्कल पाहून पोलीसही अवाक

कमरपट्ट्यातून सोन्याची तस्करी, तीन किलो सोन्यासह दोघांना अटक

प्रवाशाच्या केसांना हात लावला अन् सोनं पडायला लागलं, जाणून घ्या नेमका प्रकार काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI