व्हिस्की खरेदीच्या नादात दादरमधील 74 वर्षीय अभिनेत्रीची फसवणूक, 3 लाखांचा ऑनलाईन गंडा

अभिनेत्रीने त्यापैकी एका मोबाईल नंबरवर कॉल केला आणि व्हिस्कीसाठी 4,800 रुपये दिले, पण त्याची डिलिव्हरी तिला मिळाली नाही. त्यामुळे तिने पुन्हा त्या नंबरवर कॉल करुन आपले पैसे परत मागितले

व्हिस्की खरेदीच्या नादात दादरमधील 74 वर्षीय अभिनेत्रीची फसवणूक, 3 लाखांचा ऑनलाईन गंडा
प्रातिनिधीक फोटो

मुंबई : हिंदी टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. वाईन शॉपचा कर्मचारी असल्याचं भासवणाऱ्या सायबर गुन्हेगाराने 74 वर्षीय महिलेची 3 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबईतील दादर भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पुण्यात लग्न करणाऱ्या आपल्या पुतण्यासाठी संबंधित अभिनेत्री पार्टीचं आयोजन करणार होती. त्याला अमृत व्हिस्कीची बाटली भेट देण्याची तिची इच्छा होती. “गिफ्ट देण्यासाठी मी गुगलवर वाईन शॉपचे नंबर शोधायला गेले आणि मला दोन मोबाईल नंबर मिळाले” असे तिने पोलिसांना सांगितले.

गुगलवर शोधलेल्या नंबरवर कॉल

अभिनेत्रीने त्यापैकी एका मोबाईल नंबरवर कॉल केला आणि व्हिस्कीसाठी 4,800 रुपये दिले, पण त्याची डिलिव्हरी तिला मिळाली नाही. त्यामुळे तिने पुन्हा त्या नंबरवर कॉल करुन आपले पैसे परत मागितले. परंतु फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तिला सांगितले की, कोणतेही रिफंड मिळवण्यासाठी सरकारी नियमांनुसार वाईन शॉपमध्ये तिला ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

ओटीपी मागून फसवणूक

आरोपीने महिलेच्या डेबिट कार्डचे तपशील घेतले आणि वनटाईम पासवर्ड (OTP) जनरेट केला. अभिनेत्रीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्याने शेअर करण्यास सांगितला. हा परतावा प्रक्रियेचा भाग आहे असे समजून, तिने ओटीपी शेअर केला. अशा प्रकारे त्याने अनेक ऑनलाईन व्यवहार केले आणि तिच्या खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्सफर करुन घेतली.

क्रेडिट कार्डचेही डिटेल्स मागितले

आरोपीने नंतर तिच्या डेबिट कार्डमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याचे सांगितले आणि तिला तिच्या क्रेडिट कार्डचे तपशील देण्यास सांगितले. अभिनेत्रीने त्याचेही तपशील आणि ओटीपी शेअर केला. त्यानंतर आणखी काही ऑनलाईन ट्रांझॅक्शन्स झाल्या. एकंदरीत तिचे 3.05 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

तिने आरोपीला अनेक वेळा फोन केला, पण त्याने उचलला नाही आणि नंतर त्याचा फोन बंद (स्विच्ड ऑफ) केला. महिलेने अखेर दादरमधील शिवाजी पार्क पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

गुगलवर मोबाईल नंबर शोधून ऑनलाईन ऑर्डर न करण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून वारंवार केले जाते. त्याचप्रमाणे ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सतर्कता बाळगण्यासही सांगितले जाते. ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन ट्रँझॅक्शन करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

ऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात, प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक

VIDEO | अचानक धपकन पाठीवर हात आला आणि… सविता मालपेकरांनी सांगितला शिवाजी पार्कातील सोनसाखळी चोरीचा भयानक अनुभव

Published On - 11:45 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI