कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं, मग बायकोला झटक्यात संपवलं, थरकाप उडवणाऱ्या खुनानं राज्य हादरलं!
धुळ्यात खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या जुन्या प्रेमासाठी सैन्यात क्लर्क असणाऱ्या नराधमाने आपल्या पत्नीचा खून केला आहे.

Dhule Crime News : धुळ्यात मन सुन्न करणारी खुनाची एक धक्कादायक घटना घडलीआ आहे. आपल्या जुन्या प्रेयसीशीसाठी सैन्यात क्लर्क म्हणून काम करणाऱ्या नरादमाने आपल्याच बायकोचा विष देऊन खून केला आहे. खुनाचे हे प्रकरण समोर आल्यानंतर धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या महिेलेच नाव पूजा असून नराधम आरोपीचे नाव कपिल बाळू बागूल असे आहे.
या घटनेसंबंदि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत महिलेचा पती, सासू, नणंद व प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. विष प्रयोगासोबतच पूजा हिच्या डोक्यात वस्तू मारल्याचेही समोर आले आहे. तशी माहिती पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सैन्य दलात क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या कपिल बाळू बागुल असे खून करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे शारदा उर्फ पूजा बागुल हिच्याशी 2010 साली लग्न झाले होते. या दोघांना 9 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा आहे. कपिल याचे शिक्षण धुळ्यातील जयहिंद कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असताना प्रज्ञा कार्डिले या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. 2007 मध्ये प्रज्ञाचे लग्न झाले. प्रज्ञाला 17 व 13 वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्यात आहे. काही वर्षांपूर्वी प्रज्ञा आणि कपिल पुन्हा संपर्कात आले होते.
…नंतर पूजावर विषप्रयोग
पुन्हा संपर्कात आल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली. प्रज्ञा कर्डिलेच्या संपर्कात आल्यानंतर कपिल बागुल याने पूजाला संपवण्याचा निर्णय घेतला. नंतर पूजा त्याने विषप्रयोग केला. विषप्रयोग केल्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस यायला लागला. त्यानंतर पूजाला दीड तासांनी मृत्यूने गाठले. या काळात कपिल तडफडणाऱ्या पूजाकडे एकटक पाहत बसला होता.
गडबडीत अंत्यविधी करण्याचा प्रयोग
पूजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयातून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करायचा सल्ला देण्यात आला. पण धक्कादायक बाब म्हणजे तोपर्यंत कपिल बागुल या नराधमाने इतरांच्या मदतीने पूजाच्या अंत्यविधीची तयारी केली होती. ही बाब मात्र पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समजली.
पैशांसाठीही सुरू होता छळ
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाचे पार्थिव ताब्यात घेतले. नंतर पूजाच्या मृतदेहाचे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. यातून पूजा हिच्यावर विषप्रयोग केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी पूजा हिचा पती आरोपी कपिल, सासू विजया, नणंद रंजना, आणि प्रेयसी प्रज्ञा यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत पूजा हिचा सासरच्या मंडळींकडून पैशांसाठीदेखील छळ सुरू होता. त्याबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर पूजा हिचा जीव वाचला असता असा आरोप पूजाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
