Thane Crime : तिहेरी हत्याकांडाने ठाणं हादरलं, दारूड्या पित्याने बायकोसह मुलांनाही संपवलं..
दारूड्या इसमाने त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांची बॅटने निर्घृणपणे हत्या केल्याने एकच खळबळ माजली. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे ठाणं हादरलं.

ठाणे | 22 डिसेंबर 2023 : एका तिहेरी हत्याकांडामुळे ठाणं हादरलं. एक इसमाने त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांची बॅटने निर्घृणपणे हत्या केल्याने एकच खळबळ माजली. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या हत्याकांडानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपी अमित बागडी याचा शोध घेत आहेत.
कासारवडवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित धर्मवीर बागडी (वय 29) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा हरयाणातील हिस्सार येथील रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ठाण्यात वास्तव्यास आहे. आरोपी अमित हा बेरोजगार असून त्याच मुद्यावरून त्याचे पत्नी भावना हिच्याशी वारंवार भांडण होत असे. घटनेच्या दिवशीही त्यांच्याच असाच वाद झाला मात्र त्या वादाचा शेवट अतिशय हिंसक झाला. संतापलेल्या अमितने रागाच्या भरातच पत्नी भावना, त्याची 8 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा यांच्या डोक्यात क्रिकेट बॅटने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
भावाने नोंदवली पोलिसांत तक्रार
अमित हा बेरोजगार असल्याने त्याचा पत्नीशी वाद झाला होता. रोजच्या भांडणाला वैतागलेली त्याची पत्नी तिच्या दोन मुलांना घेऊन काही दिवसांपूर्वी तिच्या दीराच्या विकास धर्मवीर बागडी याच्या घरी रहायला गेली. दोन-तीन दिवसांपूर्वी आरोपी अमित हा त्याच्या भावाच्या घरी गेला आणि त्याने पत्नी व मुलांची भेट घेतली. त्यानंतर तो तिथेच राहिला, त्यामुळे त्या दोघांमधला वाटद मिटला असाव, असे त्याच्या भावाल वाटले.
घटनेच्या दिवशी त्याचा भाऊ विकास सकाळी 7 वाजता कामाला निघून गेला, मात्र दुपारच्या सुमारास जेव्हा तो घरी परत आला, तेव्हा त्याचे डोळेच विस्फारले. घरात त्याची वहिनी आणि तिची दोन लहान मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यांच्या शेजारीच रक्ताने माखलेली एक बॅट पडलेली होती. तर त्याचा भाऊ अमित हा तिथून फरार झाला होता. विकास याने या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. विकासने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी विकास याला शोधण्यासाठी पथके पाठवली. तो राज्याबाहेर पळून गेला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. त्याने तिघांचीही हत्या का केली असावी यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
