Delhi Crime: नोएडात महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये एका वकिलाचा समावेश
आरोपींनी फिर्यादी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ही पहिलीच नव्हती. आरोपींनी मागील अनेक दिवसांपासून तिच्यावर अत्याचार केले होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. महिलेने तिच्यावरील अत्याचाराचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण भागांबरोबरच राजधानी दिल्लीही महिलांसाठी अधिकच असुरक्षित बनत चालली आहे. आणखी एका महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. एका महिलेने नोएडा येथील सेक्टर-20 पोलिस स्टेशनमध्ये वकील व त्याच्या लिपिकासह चार जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कायद्यामध्ये कठोर तरतुदी होऊनही तसेच बलात्काराच्या खटल्यांना गती मिळूनही महिलांवरील सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील फिर्यादी महिलेच्या पतीला नोएडा पोलिसांनी काही प्रकरणांत तुरुंगात पाठवले होते. याचा आरोपींनी गैरफायदा उठवल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी सांगितले की, वकील आणि त्याच्या लिपिकाने फिर्यादी महिलेला तिच्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. ती महिला तेथे आल्यानंतर वकिलाने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. वकिली पेशाला काळीमा फासणारी ही घटना राजधानी दिल्लीत घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त अंकिता शर्मा यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बल्लभगढ येथे राहणाऱ्या एका महिलेने बल्लभगढ पोलिसांकडे तक्रार केली होती. तिच्या पतीला नोएडा पोलिसांनी निष्कारण अटक केल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.
पतीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने अत्याचार
नोएडा पोलिसांनी अटकेची कारवाई केलेल्या प्रकरणात तुझ्या पतीला आम्ही जामीन मिळवून देऊ व त्याची सुटका करून देऊ, असे वकिलाचा लिपिक विकासने फिर्यादी महिलेला फोनवर कळवले. त्यानंतर त्या महिलेला फोन करून बोलावून घेण्यात आले. त्यानुसार फिर्यादी महिला ही वकील महेश व त्याचा लिपिक विकासला भेटण्यासाठी कोर्टात गेली होती. हे लोक फिर्यादी महिलेला सेक्टर-2 मधील कार्यालयात घेऊन गेले. तेथे महेश, विकास, देवेंद्र आणि अन्य एका व्यक्तीने फिर्यादी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
फिर्यादी महिलेवर अनेक दिवसांपासून अत्याचार
आरोपींनी फिर्यादी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ही पहिलीच नव्हती. आरोपींनी मागील अनेक दिवसांपासून तिच्यावर अत्याचार केले होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. महिलेने तिच्यावरील अत्याचाराचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलिसांत दाद मागितली. त्यामुळे तिने सहन केलेल्या भयंकर अत्याचाराचा उलगडा झाला आहे.
पोलिसांचे काय म्हणाले?
या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात सूत्रे हललेल्या या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. फिर्यादी महिलेचे जीवन संकटात असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्टर 20 पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. पीडितेचे म्हणणे आहे की, तिच्यावरील सामूहिक बलात्काराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पतीही साथ सोडून गेला आहे. त्यामुळे जगणे कठीण झाल्याची कैफियत फिर्यादी महिलेने मांडली आहे. (Gang rape of a woman in Noida, The accused include a lawyer)
इतर बातम्या
UP Crime : उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू
