चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवा, उत्तरं देते, फोन टॅपिंग प्रकरणी समन्सला रश्मी शुक्लांचं उत्तर
मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवारी (आज) मुंबईत सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे समन्स रश्मी शुक्लांना बजावण्यात आले होते ( IPS Officer Rashmi Shukla Summons)

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) सध्या फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीला सामोरे जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन, असं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला दिलं आहे. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. (IPS Officer Rashmi Shukla answer to Summons in alleged Maharashtra Ministers Phone Tapping Case)
जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल (आज) रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं. फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी शुक्ला यांना समन्स पाठवण्यात आलं आहे.
“कोरोना परिस्थितीमुळे मुंबईस हजेरी अशक्य”
महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं.
रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.
रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”
हेही वाचा :
अनेक मंत्र्यांचे फोन टॅप, जितेंद्र आव्हाडांचे आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप
मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरण, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स
रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं? चंद्रकांत पाटलांचा सवाल
(IPS Officer Rashmi Shukla answer to Summons in alleged Maharashtra Ministers Phone Tapping Case)
