…अन् त्यानं गर्भवती लेकीला धाड धाड गोळ्या घातल्या, जळगाव हत्याकांडाचं धक्कादायक कारण समोर!
सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी असलेल्या बापाने आपल्या विवाहित मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली आहे.

Jalgaon Crime News : सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी असलेल्या बापाने आपल्या विवाहित मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली आहे. या घटनेत मुलीच्या बापाने जावयावरसुद्धा गोळी झाडली. यात जावई गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गोळीबार करणाऱ्या बापाला बेदम मारहाण केल्याने तोसुद्धा गंभीर जखमी असून त्याच्यावर जळगाव शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हत्याकांडाचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे.
पळून जाऊ केलं लग्न
तृप्तीने तिच्या वडिलांचा नकार असतानासुद्धा पळून जाऊन अविनाश यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. प्रेम विवाहानंतर तृप्ती तिच्या सासरी म्हणजेच पुण्यात राहात होती. पती अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचे जळगावच्या चोपडा शहरात लग्न असल्याकारणाने दोघेही लग्नासाठी चोपडा येथे आले होते. या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमानंतर सर्व नातेवाईक कुटुंबीय नाचत असताना याचवेळी तृप्तीचे वडील किरण मांगले तिथे आला.
नवरा गंभीर जखमी, पुण्यात उपचार
त्याने त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून नाचत असलेल्या तृप्ती तसेच जावई अविनाश यांच्यावर गोळीबार केला. यात तृप्ती जागीच ठार झाली तर अविनाश याला कमरेत गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित संतप्त वऱ्हाडी ग्रामस्थांनी तृप्तीचे वडील किरण मांगले याला बेदम मारहाण केली.
एकमेकांवर जीव कसा जडला?
मिळालेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तृप्ती आणि अविनाश हे पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आले. तृप्ती ही MBBS च्या दुसऱ्या वर्षाला पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले. हा प्रेम विवाह तृप्तीच्या सीआरपीएफमध्ये अधिकारी असलेल्या वडिलांना मान्य नव्हता. त्यानंतर तृप्ती आणि अविनाश यांनी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर ते दोघेही गुण्यागोविंदाने अविनाशच्या घरी संसार करू लागले.
प्रेमविवाहाला होता किरण मांगलेचा नकार
मात्र या प्रेमविवाहाला तिच्या वडिलांची मान्यता नव्हती. याचाच राग त्यांच्या मनात घर करून कायम होता. त्यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले हे तृप्तीला तसेच तिच्या सासरच्यांना कायम त्रास देत होते. विशेष म्हणजे एकदा तर किरण मांगलेने तृप्तीचा एकदा गर्भपातही केला होता. या वादामुळे तृप्ती परत माहेरी गेली नाही. अशी माहिती तिची सासू प्रियंका वाघ यांनी बोलताना दिले आहे.
कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचाही राग
मुलीने कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचा राग किरण मांगलेच्या मनात होता. याच रागातून किरण मांगलेने चार महिने गर्भवती असलेल्या मुलीवर गोळ्या झाडल्या. या घटनेने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
