Jalgaon honor killing सुडाने पेटलेल्या बापाने हळदीत नाचणाऱ्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर केला गोळीबार..
प्रेम विवाहानंतर तृप्ती ही तिच्या सासरी पुण्यात राहत होती. पती अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचाच हा विवाह सोहळा होता. त्यात हे सैराटलाही लाजवणारे हत्याकांड घडले आहे.

जात नाही ती जात असे म्हटले जाते…खोट्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेपायी बापानेच पोटच्या मुलीला आणि जावयावर सर्व्हीस रिव्हॉलव्हरमधून गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा जीव तर जागच्या जागी गेलाच शिवाय तिच्या पोटातील नवा अंकुर जगात येण्याआधीच खुडला गेला आहे. तर जावयाच्या पोटात गोळी लागल्याने त्याला पुण्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून सीआरपीएफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने एका लग्न सोहळ्यात जावई आणि मुलगी नाचत असतानाच त्यांच्यावर गोळ्यांच्या फेरी झाड्याने संपूर्ण मंडपात मातम पसरला..ही हृदयद्रावक घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली असून खोटी प्रतिष्ठा आणि जातीय अहंकाराचा आणखी एक बळी गेल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे.
आंबेडकर नगरामध्ये हळदीच्या कार्यक्रमात रक्ताचे पाट
तृप्ती वाघ या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या, अविनाश वाघ आणि तृप्ती यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मुलीच्या बापाच्या मनात खदखदत होता. मुलीने चारचौघात अब्रु घालविली या रागाने फणफणलेल्या किरण मांगले यांनी पुण्यातून आपल्या होणाऱ्या जाऊ बाईंच्या लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात चोपडा शहरात आलेल्या मुलीवर हा गोळीबार केला आणि लग्न मंडपात एकच हाहाकार उडाला. तृप्ती यांचे वडिल किरण मांगले त्याठिकाणी आले त्यावेळी मुलीला आणि जावयाला नाचताना पाहून त्यांचे डोके भणभणले आणि त्यांनी जवळून या दाम्पत्यावर गोळीबार केला. चोपडा शहरातील आंबेडकर नगरामध्ये हळदीच्या कार्यक्रमात ही गोळीबाराची भयानक घटना घडली.
बहिणीचा विवाह सोहळा काळवंडला
अविनाश यांच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा या घटनेमुळे आज अंत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले गोळीबार करणारे मुलीचे वडिल किरण अर्जुन मांगले (४८ ) यांच्यावर एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तृप्ती (२४ ) हीने तिच्या वडिलांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन अविनाश वाघ (२८ ) यांच्याशी प्रेमविवाह केला होता.
