Jalgaon Crime : ट्रकखाली क्लीनर झोपला, ड्रायव्हरने ट्रक सुरू करताच अनर्थ घडला…
एमआयडीसी येथील सी-सेक्टरमधील कंपनी परिसरात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. ड्रायव्हरने आतमध्ये बसून ट्रक सुरू केला आणि तेवढ्यात चाकाखाली कोणीतरी आल्याचे त्याला जाणवले. खाली उतरून तपासले असता समोरचे दृश्य बघून तो हादरलाच.

जळगाव | 19 ऑक्टोबर 2023 : जळगावमध्ये (jalgaon) एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ट्रक खाली झोपलेल्या क्लीनरच्या अंगावरून ट्रक (truck cleaner died) गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्लीनर ट्रक खाली झोपला होता, हे ड्रायव्हरला कळलेच नाही, त्याने आतमध्ये बसून वाहन सुरू केले आणि क्षणात अनर्थ घडला. जळगावच्या एमआयडीसी परिसरात ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दीपक विनोद मेढे (वय ३८, रा. फैजपूर,) असे मृत ड्रायव्हरचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील एमआयडीसी येथील सी-सेक्टरमधील कंपनी परिसरात बुधवारी दुपारी २ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. तेथे एका कंपनीसमोर एक ट्रक उभा केला होता. दीपक मेढे हा ट्रकचा क्लीनर त्याच ट्रकच्या खाली झोपला होता. मात्र ही गोष्ट ट्रक ड्रायव्हरला माहिती नव्हती. क्लीनर दुसरीकडे कुठे गेला असावा, असं ड्रायव्हरला वाटलं. त्यामुळे तो ट्रकमध्ये बसला आणि ट्रक सुरू करून पार्क केलेल्या जागेवरून बाहेर काढला. पण ट्रकचा चाक क्लीनरच्या अंगावरून गेलं. ट्रकच्या चाकाखाली कोणीतरी आल्याचं ड्रायव्हरच्या लक्षात आलं, त्यांनी तातडीने ट्रक थांबवून उडी मारली आणि खाली वाकून पाहिले असता, क्लीनर दीपक ट्रकखाली आल्याचे पाहून तो हादरलाच.
या घटनेत क्लिनरच्या चेहऱ्याचा संपूर्ण चेंदामेंदा झाला तसेच त्याचे हात-पायही तुटले. या दुर्घटनेत क्लीनर दीपक मेढे याचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या दुर्घटनेसंदर्भात एमआयडीसी परिसरात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
