कल्याणमध्ये बाईक्स आणि मोबाईल चोरांचा सुळसुळाट, पोलिसांना मोठं यश, इराणी टोळीला अटक
कल्याणमधील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी खडकपाडा पोलिसांनी एका १९ वर्षीय इराणी तरुणाची अटक केली आहे. त्याच्याकडून अनेक चोरी केलेले मोबाईल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहेत.

कल्याणमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. खडकपाडा पोलिसांनी एका मोठ्या इराणी टोळीचा पर्दाफाश करत १९ वर्षीय गाजी हुसैन इराणी याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी आपल्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना घेऊन चोऱ्या करत होता. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे कल्याण परिसरातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण आणि आसपासच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. ज्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले होते. खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना, कल्याण झोन तीनच्या स्पेशल स्कॉटला एका संशयित इराणीबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित गाजी हुसैन इराणीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले.
3 मोटरसायकल आणि 14 महागडे मोबाईल फोन जप्त
पोलिसांनी गाजी हुसैन इराणीकडून तीन महागड्या मोटरसायकल आणि १४ महागडे मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मोटरसायकलींमध्ये भिवंडी तालुका, शीळ आणि डायघर परिसरातील दोन मोटरसायकलींचा समावेश आहे, तर एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेली होती. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, गाजी उर्फ हुसेन आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांसह मुंबई, ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण या भागातून हे सर्व मोबाईल चोरले होते.
पुढील तपासासाठी महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती
कल्याणमधील सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. “गाजी हा आपल्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना घेऊन हे गुन्हे करत होता. त्याच्या अटकेमुळे कल्याण परिसरातील चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांना पुढील तपासासाठी महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत.” या कारवाईमुळे कल्याणमधील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पोलीस आता या टोळीच्या इतर सदस्यांचा आणि त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा शोध घेत आहेत. या अटकेमुळे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ढकलणाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
