कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी

नदीत तिघांचे मृतदेह आढळले, तेव्हा आई-वडिलांचे हात लहान मुलाला दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते. (Kolhapur Family Suicide in River)

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 12:14 PM, 16 Apr 2021
कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी
पन्हाळ्यात कुंभी नदीत उडी घेत कुटुंबाची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरात त्रिकोणी कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पन्हाळा तालुक्यातील दाम्पत्याने चिमुकल्याला दोरीला बांधून नदीत उडी घेतली. एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने कोल्हापुरात खळबळ उडाली असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. (Kolhapur Panhala Family Commits Suicide in Kumbhi River)

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोठे गावात ही हृदयद्रावक घटना घडली. कुंभी नदीपात्रात आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचे मृतदेह सापडले. संबंधित कुटुंब काल (गुरुवारी) रात्री 11 वाजल्यानंतर घरातून बाहेर पडलं होतं. त्यानंतर तिघांनी आयुष्य संपवल्याचा अंदाज आहे. आज (शुक्रवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. नदीत तिघांचे मृतदेह आढळले, तेव्हा आई-वडिलांचे हात लहान मुलाला दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते.

कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र

गेल्या काही दिवसात कौटुंबिक आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. औरंगाबादेत विवाहितेने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली, तर कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने नांदेडमध्ये पत्नीने मुलासह आयुष्य संपवलं. अकोला जिल्ह्यातही बुलडाण्यातील मायलेकाने नदीत उडी घेत आत्महत्या केली होती.

कौटुंबिक कलहातून विवाहितेची आत्महत्या

कौटुंबिक कलहाला वैतागून विवाहितेने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गावात घडली. पडक्या विहिरीत उडी घेऊन महिलेने लेकरांसह आयुष्य संपवलं. मात्र महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडली होती. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं. (Kolhapur Family Suicide in River)

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या

अकोला जिल्ह्यातील मन नदीत मायलेकाने आत्महत्या केली होती. आधी 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीत आढळला. तरुणासोबतच त्याच्या आईनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं नंतर समोर आलं. मायलेकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. दोघेही जण बुलडाण्याचे रहिवासी असल्याचं समोर आलं.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या, नदीत उडी घेत आयुष्याची अखेर

कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

(Kolhapur Panhala Family Commits Suicide in Kumbhi River)