400 जणांची चौकशी, 150 सीसीटीव्हींचा तपास, आठ दिवस पोलिसांची तारांबळ, अखेर मुलानेच आईची हत्या केल्याचं उघड

दिल्लीत एका महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.

400 जणांची चौकशी, 150 सीसीटीव्हींचा तपास, आठ दिवस पोलिसांची तारांबळ, अखेर मुलानेच आईची हत्या केल्याचं उघड
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : दिल्लीत एका महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. यासाठी पोलिसांनी संबंधित घटना ज्या परिसरात घडली तिथून ते दूपर्यंतच्या अनेक दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी जवळपास 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज बघितले. तसेच 400 पेक्षा जास्त व्यक्तींची चौकशी केली. गेल्या आठ दिवसांपासून दिल्ली पोलीस दिवसरात्र तपासात व्यस्त होते. अखेर या प्रकरणात त्यांच्या हाती मुख्य आरोपी लागला आहे. विशेष म्हणजे संबंधित आरोपीने जेव्हा गुन्हा कबूल केला तेव्हा पोलीसही चक्रावले. कारण आरोपी हा दुसरा-तिसरा कुणी नसून चक्क महिलेचा पोटचा मुलगा होता. संबंधित प्रकरण जगजाहीर झाल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी दिल्लीत सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे महिलेच्या मृतदेहाजवळ जिवंत काडतूसे आणि गावठी कट्टा (पिस्तूल) आढळले होते. महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या महिलेच्या हत्येमागे नेमका कुणाचा हात होता, याचा तपास पोलीस गेल्या आठ दिवसांपासून करत होते. अखेर महिलेच्या मुलानेच तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर मुलगा आपल्या जन्मदाती आईची हत्या कशी करु शकतो? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महिलेची रुग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज

संबंधित घटना ही 1 सप्टेंबरला दिल्लीतील मुंडका पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. आरोपी मुलाने आईच्या डोक्यात गोळी झाडली होती. ही गोळी महिलेच्या गळ्याला लागली. महिला प्रचंड जखमी झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. रक्तबंबाळ महिलेच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात आली. महिलेने रुग्णालयात जवळपास सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण 6 सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.

आरोपीला अखेर बेड्या

दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरु होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा महिलेजवळ जिवंत काडतुसे आणि पिस्तूल सापडली होती. पोलिसांनी सलग सात दिवस या प्रकरणाचा तपास केला. वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. शेकडो माणसांची चौकशी केली. अखेर महिलेच्या मुलानेच तिची हत्या केल्याच्या निष्कार्षापर्यंत पोलीस आले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीने आपल्या आईची हत्या का केली?

आरोपी हा मद्यपानाच्या आहारी गेला होता. त्याला दारुचं व्यसन होता. तो आधी ड्रायव्हरचं काम करायचा. पण त्याने काम सोडलं होतं. याशिवाय त्याचं पत्नीसोबतही भांडण झालेलं होतं. त्यामुळे त्याची पत्नी रागात आपल्या माहेरी निघून गेलेली होती. विशेष म्हणजे त्याला पाच वर्षांची मुलगीदेखील आहे. पण दारुच्या व्यसनामुळे त्याच्या संसाराचा भनका झालेला होता. याच कारणावरुन त्याचे आईसोबतही खटके उडायचे. त्यामुळे त्याने रागाच्या भरात आपल्या आईचीदेखील हत्या केली, अशी माहिती आता समोर आली आहे.

हेही वाचा :

‘घटस्फोट दे, नाहीतर बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करेन’, राक्षसी पतीकडून धमकी, मुंबईतील संतापजनक घटना

VIDEO : हा चित्रपट नाही, ही खरी हत्या, नाशिकमध्ये मध्यरात्री रस्त्यावर हत्येचा थरार, सीसीटीव्हीत घटना कैद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI