‘माझ्या पत्नीचे नेत्यासोबत प्रेमसंबंध, ते दोघे मला ठार मारतील’, हताश पतीची पोलिसात धाव
गेल्या काही महिन्यांपासून परपुरुषासोबत संबंध असणाऱ्या अनेक महिलांनी आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आता एका व्यक्तीने पत्नी आणि प्रियकरापासून मला धोका असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून परपुरुषासोबत संबंध असणाऱ्या अनेक महिलांनी आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. खासकरुन मेरठच्या मुस्कानने पतीची हत्या केली होती, तसेच इंदूरच्या सोनमने हनीमुनला गेल्यावर पतीला संपवलं होतं. त्यानंतरही अशा अनेक घटना समोर आल्या होत्या.
अशातच आता उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका पतीने समाजवादी पार्टीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. पती पोलिसात धाव घेत म्हणाला की, ‘सपा नेत्याने माझ्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे. आता दोघेही मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत.’ पतीच्या या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र यामुळे पती खूप घाबरला आहे. त्याने पोलिस अधिकाऱ्यांकडे आरोपी नेत्याला अटक करण्याची विनंती केली आहे.
पंकी पोलीस स्टेशन हद्दीतील आशिष कुमार गुप्ता यांनी आपली पत्नी आणि सपा नेते सत्यम द्विवेदी यांच्यात अवैध संबंध असल्याचे म्हटले आहे. तसेच हे दोघे मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, मला या दोघांनी मारहाण केली आहे, त्यामुळे मी पत्नीपासून दूर माझ्या आईसोबत राहत आहे असं आशिष कुमार गुप्ता यांनी म्हटलं आहे.
आरोपींवर कारवाई नाही
आशिष यांनी असाही आरोप केला आहे की, 12 जून रोजी कामावरून घरी परतत असताना काही अज्ञात तरुणांनी पत्नीच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला केला आणि मला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पंकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
पुढे बोलताना आशिष यांनी असंही म्हटलं आहे की, सपा नेते सत्यम द्विवेदी यांनी घराजवळील एका भूखंडावर बेकायदेशीरपणे कब्जा केला असून तेथे अवैध अड्डा चालवत आहेत, त्यामुळे माझे कुटुंब दहशतीत जगत आहे. त्यामुळे आरोपींवर तात्काळ कारवाई करावी.
माझ्या जीवाला धोका
आशिष कुमार गुप्ता यांनी आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. जर सपा नेत्याला लवकर अटक केली नाही तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आरोपी नेत्याला अटक होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
