धक्कादायक, जमिनीच्या वादातून गोळीबार करत जमावाचा कंपनीवरच हल्ला, एक जखमी, ४१ अटकेत
आरोपींकडून पोलीसांनी चार रायफली, मिरची स्प्रे तसेच हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

मुंबईत आग्रीपाडा परिसरात जमीनीच्या वादातून जमावाने गोळीबार करीत लाठ्याकाठ्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या प्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी तब्बल ४१ जणांना अटक केली असून या सर्व आरोपींना रविवारी किल्ला कोर्टात महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या सर्वांना एका दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आग्रीपाडा जागेवरील वादातून मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर शनिवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. या वेळी जमावाने कंपनीच्या कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी रायफलने गोळीबार करीत दगड आणि विटांचा मारा करीत हल्ला केला. लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांनी जमावाने हा हल्ला केला.या हल्ल्यात मॅग्नम मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एक कर्मचारी जखमी झाले आहेत. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी फ्रॅंको इंडिया फार्मासयु्टिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ४१ जणांना अटक केली आहे.
एका दिवसाची पोलीस कोठडी
अटक आरोपीत २० महिला तर 21 पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार रायफली, मिरची स्प्रे तसेच हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपीना रविवारी किल्ला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथे मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकी जागेवरून वाद आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ असून मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी जैसे थे आदेश दिले आहेत.