Bal Bothe | रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, विनयभंगाचा गुन्हा दाखल

राज्यात खळबळ माजवलेल्या रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ झालीय. आता बाळ बोठे यांच्या विरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल झालाय.

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 19:46 PM, 27 Dec 2020
Bal Bothe | रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगर : राज्यात खळबळ माजवलेल्या रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ झालीय. आता बाळ बोठे यांच्या विरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल झालाय. अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 वर्षीय विवाहित महिलेने बोठे विरोधात पोलीस तक्रार केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला (Molestation FIR registered against Journalist Bal Bothe in Ahmednagar).

सुपारी, हत्या आणि आता विनयभंग अशा विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्याने आरोपी बाळ बोठे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, रेखा जरे हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांना एक मोठं यश मिळालंय. पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपी बाळ बोठे (Bal Bothe) याला मदत करणाऱ्या संशयिताला पुण्यातून ताब्यात घेतलंय. या संशयिताकडून बाळ बोठेच्या ठावठिकाण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयिताचे नाव निलेश शेळके असे आहे. निलेश शेळके हा डॉक्टर असून तो गेल्या अडीच वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. पोलीस सध्या बाळ बोठे याचा कसून शोध घेत आहेत. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून निलेश शेळके याला ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक बाळ बोठेला पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा निलेश शेळके पोलिसांच्या हाती लागला.

बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. मारेकऱ्यांनी याबाबतची कबुली दिल्यानंतर बाळ बोठे फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठेला तपासण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी केली होती. मात्र, तरीही बाळ बोठे कुठे लपून बसला आहे, याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. या सर्व कालावाधीत निलेश शेळके याने बाळ बोठेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्याप्रकरण: आरोपी बाळ बोठेला मदत करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक

बाळ बोठेचा लॉक्ड मोबाईल करणार हत्याकांडाचं प्रकरण अनलॉक?

रेखा जरे हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठेला मोठा धक्का; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

व्हिडीओ पाहा :

Molestation FIR registered against Journalist Bal Bothe in Ahmednagar